
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
‘मुलींची पहिली शाळा सुरू झालेल्या पुणे शहरातील महिला आणि विद्यार्थिनींचे अनेक प्रश्न आहेत. पेपरफुटीसह विविध समस्यांना त्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांचा आवाज ऐकण्यासाठी आणि त्यांच्याशी संवाद साधून विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात येत आहेत. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात मुलींना प्राधान्य दिले जाणार आहे,’ अशी माहिती काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांनी दिली.
काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ठाकूर बोलत होत्या. यावेळी ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमासाठी तयार करण्यात आलेल्या टी-शर्टचे अनावरण करण्यात आले. राजस्थानच्या माजी मंत्री रेहाना चिस्ती, माजी मंत्री सतेज पाटील, प्रदेश काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चवधरी, प्रशांत जगताप, प्रदेश उपाध्यक्ष रमेश बागवे, के. बी. बैजु, मनोज त्यागी, काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे आणि गोपाळ तिवारी उपस्थित होते.
ठाकूर म्हणाल्या, “मुलींचे प्रश्न वेगळे आहेत. त्यांना आपले प्रश्न मांडण्यासाठी योग्य व्यासपीठ मिळाले पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शिक्षणाची दारे खुली केली. त्याच पुण्यात आज मुलींचा आवाज ऐकला गेला पाहिजे.”
मुलींच्या शिक्षणासह पेपरफुटी आणि विद्यार्थिनींना भेडसावणाऱ्या विविध प्रश्नांवर राहुल गांधी त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यार्थिनींना आपले प्रश्न मांडण्याची संधी देऊन त्यांच्या अडचणी आणि अपेक्षा जाणून घेण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून केला जाणार असल्याचे ठाकूर यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु