
सोलापूर, 20 ऑगस्ट, (हिं.स.)।
जिल्ह्यातील शाळा तसेच धोकादायक वर्गखोल्यांचे संरचनात्मक परीक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले आहेत. मात्र, या परीक्षणासाठी मोठ्या प्रमाणात निधीची आवश्यकता असून, त्याचा खर्च कोण करणार, असा सवाल जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज माने यांनी उपस्थित केला आहे.
या संदर्भात माने यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष वैद्य यांच्याकडे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन तसेच सर्व विभागप्रमुखांची बैठक घेण्याची मागणी केली. यावेळी बांधकाम विभाग क्रमांक एकचे कार्यकारी अभियंता आसिफ खैरादी उपस्थित होते.
शाळांच्या इमारतींची सुरक्षितता विद्यार्थ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शाळांच्या इमारतींचे संरचनात्मक परीक्षण करणे आवश्यक असले तरी त्यासाठी लागणाऱ्या निधीची तातडीने तरतूद करणे गरजेचे आहे. निधी उपलब्ध नसताना परीक्षणाचे आदेश देण्यात आले आहेत; मात्र त्यानंतरची कार्यवाही कशी होणार, असा प्रश्न माने यांनी उपस्थित केला.
संरचनात्मक परीक्षणासाठी आवश्यक निधीची तरतूद, परीक्षणाची कार्यपद्धती आणि धोकादायक वर्गखोल्यांबाबत करावयाच्या उपाययोजना निश्चित कराव्यात, अशी मागणी माने यांनी केली आहे. याबाबत लवकरच मुख्य कार्यकारी अधिकारी आणि विभागप्रमुखांची बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिले.
शाळांच्या इमारतींच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर असल्याने संरचनात्मक परीक्षणाबरोबरच त्यासाठी आवश्यक निधीची उपलब्धता आणि धोकादायक इमारतींवर तातडीने उपाययोजना करण्याकडे आता लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड