रत्नागिरी : शाळकरी विद्यार्थ्यांना सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद करण्याचा उपक्रम
रत्नागिरी, 20 ऑगस्ट, (हिं.स.) । विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अवांतर वाचनाची सवय लागावी आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे ज्ञानसाहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना शासकीय व शासनमान्य सार
रत्नागिरी : शाळकरी विद्यार्थ्यांना सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद करण्याचा उपक्रम


रत्नागिरी, 20 ऑगस्ट, (हिं.स.) । विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, अवांतर वाचनाची सवय लागावी आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या माध्यमातून त्यांना विविध प्रकारचे ज्ञानसाहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी शाळकरी विद्यार्थ्यांना शासकीय व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद करून घेण्याचा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाने दिल्या आहेत.

जिल्ह्यातील सर्व शासकीय, शासनमान्य अनुदानित व विनाअनुदानित शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक व प्राचार्यांना याबाबतचे पत्र पाठविण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींना सार्वजनिक ग्रंथालयांचे सभासद होण्यासाठी प्रोत्साहित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील ३ शासकीय व १४४ शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची यादी पत्रासोबत देण्यात आली आहे. आपल्या परिसरातील ग्रंथालयाशी संपर्क साधून विद्यार्थी व शालेय कर्मचारी यांना सभासद करून घेण्याची कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

वाचनसंस्कृती रुजविण्याच्या या उपक्रमात शाळांनी सक्रिय सहभाग घ्यावा, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल संबंधित शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जिल्हा परिषद, रत्नागिरी कार्यालयास सादर करावा, असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.

शासकीय ग्रंथालयातील व्यक्ती सभासद व संस्था सभासद होण्यासाठी शासन निर्णयानुसार निर्धारित शुल्क आकारण्यात येते. शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांच्या वर्गणी व सभासदत्वाबाबत संबंधित ग्रंथालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांच्या पलीकडे विविध विषयांचे साहित्य उपलब्ध करून देत त्यांच्या ज्ञानकक्षा रुंदावण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार असून, जिल्ह्यातील शाळांनी त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande