
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
देशी बनावटीचे १७ पिस्तूल आणि ४७ जिवंत काडतुसे बाळगल्याप्रकरणी अकलूज ग्रामीण पोलिसांनी सहा जणांना अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १८ लाख ४७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक केलेल्या संशयितांना २१ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणातील दोघे संशयित अद्याप फरार आहेत.
टेंभुर्णी रस्त्यावर देशी बनावटीचे पिस्तूल विक्रीसाठी काही तरुण येणार असल्याची माहिती अकलूज पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून विकास कैलास वजाळे याला कारसह ताब्यात घेतले. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी आणखी पाच संशयितांना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये विकास कैलास वजाळे (३१, रा. पारिते, ता. माढा), राहुल सतीश माने (३४, रा. मिरज), महादेव बाळासाहेब कोरके (३०, रा. करकंब, ता. पंढरपूर), विजय सदाशिव करणगी (४५, रा. शिवपूर, ता. अथणी, जि. बेळगाव), अनिल पंचलाल मेहता (३२, रा. रांजणगाव, ता. वरला, जि. वडवान, मध्य प्रदेश) आणि सुमीत नाना लवटे (१९, रा. भुईटे वस्ती, ता. सांगोला) यांचा समावेश आहे.
या प्रकरणातील प्रदीप पांडुरंग माने (रा. चिकमहूद, ता. सांगोला) आणि शनी भारत बनसोडे (रा. अकोले खुर्द, ता. माढा) हे दोघे फरार आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
ही कारवाई पोलिस निरीक्षक उबाळे, सहायक पोलिस निरीक्षक विक्रम साळुंखे, सहायक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे आणि पोलिस उपनिरीक्षक विशाल कदम यांच्या पथकाने केली.
सोलापूर ग्रामीणचे पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत या कारवाईची माहिती दिली. मोठ्या प्रमाणात गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे जप्त झाल्याने या प्रकरणामागील शस्त्रविक्रीचे नेटवर्क शोधण्याच्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड