
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। मध्य प्रदेशातून गावठी बनावटीची पिस्तुले आणून सोलापूर, सांगली आणि कर्नाटकातील बेळगाव परिसरात बेकायदा विक्री करणारे आंतरराज्य शस्त्र रॅकेट अकलूज पोलिसांनी उद्ध्वस्त केले. या कारवाईत मध्य प्रदेशातील मुख्य पुरवठादारासह आठ जणांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून १७ देशी बनावटीची पिस्तुले, ४७ जिवंत काडतुसे आणि गुन्ह्यात वापरलेली कार असा एकूण १८ लाख ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सोलापूर-अकलूज-टेंभुर्णी रस्त्यावरील संगम फाट्याजवळ शस्त्रविक्रीसाठी एक व्यक्ती येणार असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून विकास कैलास वजाळे याला कारसह ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून दोन पिस्तुले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली. चौकशीत त्याने मध्य प्रदेशातील बडवाणी येथील अनिल पंचलाल मेहता याच्याकडून राहुल सतीश मानेच्या मध्यस्थीने शस्त्रसाठा घेतल्याचे तपासात निष्पन्न झाले.
अनिल मेहता हा मध्य प्रदेशातून धुळे जिल्ह्यातील सोनगीर येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकाने तेथे सापळा रचला. मेहता याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीतून चार पिस्तुले आणि २५ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.
मेहता याच्या चौकशीनंतर त्याचा साथीदार राहुल सतीश माने यालाही टेंभुर्णी परिसरातून अटक करण्यात आली. त्यानंतर शस्त्रे खरेदी करणाऱ्या महादेव कोरके, विजय किरणगी, सुमित लवटे, प्रदीप पांडुरंग माने आणि शनि बनसोडे यांच्यावर कारवाई करून उर्वरित शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आला.
या कारवाईमुळे मध्य प्रदेशातून महाराष्ट्र आणि कर्नाटकात होणाऱ्या बेकायदा शस्त्रपुरवठ्याचे जाळे समोर आले असून, या रॅकेटशी आणखी कोणाचा संबंध आहे का, याचा तपास अकलूज पोलिसांकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड