
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर सध्या राजकीय आणि प्रशासकीय हालचालींचे प्रमुख केंद्र ठरले आहे. विधिमंडळ अंदाज समितीच्या सदस्य आमदारांच्या मुक्कामाची व्यवस्था याच हॉटेलमध्ये करण्यात आली असून, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीचे आयोजनही याच ठिकाणी करण्यात आले आहे. त्यामुळे बालाजी सरोवरला सध्या व्हीआयपींचा वावर वाढला आहे.
आमदार अर्जुन खोतकर यांच्या अध्यक्षतेखालील विधिमंडळ अंदाज समिती तीन दिवसांच्या सोलापूर दौऱ्यावर आली आहे. समितीत २७ आमदारांचा समावेश असून, शासनाकडून विविध विकासकामांसाठी मिळालेल्या निधीचा योग्य वापर झाला आहे का, याचा आढावा समितीकडून घेतला जाणार आहे. समितीच्या आमदारांच्या मुक्कामाची व्यवस्था बालाजी सरोवर येथे करण्यात आली आहे.
दरम्यान, भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठकीचे उद्घाटन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. बैठकीसाठी आलेल्या प्रमुख मान्यवरांचे अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांची मूर्ती देऊन स्वागत करण्यात आले.
या बैठकीला भाजपचे एसआयआर सेलचे महाराष्ट्र प्रभारी समन्वयक भगवानदास सबनानी, माजी खासदार किरीट सोमय्या, प्रदेश उपाध्यक्ष आमदार गोपीचंद पडळकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री जयकुमार गोरे, माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, समन्वयक आमदार निरंजन डावखरे, मकरंद देशपांडे, माजी आमदार राम सातपुते, तुळजापूरचे आमदार राणाजगजितसिंह पाटील, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आमदार व पदाधिकारी उपस्थित आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापूर दौरा अपरिहार्य कारणामुळे रद्द झाल्याची माहिती देण्यात आली.
बैठकीत आगामी काळातील पक्षाची संघटनात्मक बांधणी, एसआयआर पडताळणी तसेच पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातील मतदार नोंणी मोहिमेचा आढावा घेतला जात आहे. पक्षाचे नगरसेवक, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांना मतदार नोंदणीची स्वतंत्र जबाबदारी देऊन संघटन विस्ताराला गती देण्यावर चर्चा होत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड