सोलापूर महापालिकेतील नालेसफाई गैरप्रकार; नगर अभियंत्यासह १८ जणांवर ठपका
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात गैरप्रकार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी नगर अभियंत्यासह १८ जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आले असून, चौकशी समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्तांकडे सा
smc


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर महापालिकेच्या नालेसफाईच्या कामात गैरप्रकार झाल्याचे चौकशी समितीच्या अहवालातून समोर आले आहे. या प्रकरणी नगर अभियंत्यासह १८ जणांवर दोषारोप निश्चित करण्यात आले असून, चौकशी समितीने आपला अहवाल महापालिका आयुक्तांकडे सादर केला आहे. मक्तेदाराला तब्बल ८१ लाख ३६ हजार ४२८ रुपये जादा रक्कम अदा झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

नालेसफाईच्या कामासाठी एक्सॅवेटर लाँग बूम अर्थात पोकलेनसाठी प्रतितास ४ हजार ५०० रुपये दर निश्चित करण्यात आला होता. त्यानुसार आठ तासांसाठी ३६ हजार रुपये दर अपेक्षित असताना ४८ हजार रुपये दराने तांत्रिक मान्यता देण्यात आली. हा दर तब्बल ३३.३३ टक्के वाढीव असल्याचे चौकशीत आढळले.

तसेच तांत्रिक मंजुरी योग्य असतानाही ४०.२० टक्के वाढीव दराला मान्यता देण्यात आल्याचे अहवालात नमूद आहे. नगर अभियंता विभागाने शहर सुधारणा विभागाशी योग्य समन्वय न साधणे आणि ई-फाईल न पाठविणे ही बाबही चुकीची असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

नगर अभियंता सारिका आकुलवार यांनी ११ बिले सुधारित केली. मात्र, या बिलांवर नियंत्रण अधिकाऱ्यांच्या सह्या घेण्यात आल्या नसल्याचे चौकशीत समोर आले. त्यामुळे महापालिकेचे ८१ लाखांहून अधिक रुपये मक्तेदाराला जादा दिल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, नालेसफाईची सर्व बिले अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या नियंत्रणाखाली पुन्हा सुधारित करून घ्यावीत आणि त्यानंतरच मक्तेदाराला देण्यात यावीत, असे निर्देश महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी दिले आहेत. संबंधित दोषींनी सात दिवसांत खुलासा सादर करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande