
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने आणि नियोजन विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या महा-स्ट्राईड अभियानात सोलापूर जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निवड झालेल्या राज्यातील १३ जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा समावेश असून, जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे कामगिरीवर आधारित प्रोत्साहन अनुदान मंजूर झाले आहे.
या उल्लेखनीय कामगिरीबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांना पत्र पाठवून अभिनंदन केले आहे.
सोलापूर जिल्ह्याला यंदा ८२ टक्के एकत्रित गुणांकन मिळाले असून, राज्यातील १३ पात्र जिल्ह्यांमध्ये सोलापूरचा चौथा क्रमांक आला आहे. तर पुणे विभागातील चार जिल्ह्यांमध्ये सोलापूरने तिसरा क्रमांक मिळवला आहे. जिल्हा प्रशासनाने राबविलेल्या जिल्हा धोरणात्मक आराखड्यांची मुख्यमंत्र्यांनी विशेष दखल घेतली आहे.
वार्षिक धोरणात्मक कृती आराखड्याची अंमलबजावणी करताना सोलापूर जिल्ह्याने जवळपास १४२ कोटी रुपयांचे खासगी भांडवल उभारले आहे. यामुळे सोलापूर गुंतवणुकीसाठी आकर्षक जिल्हा म्हणून पुढे येत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. राज्याच्या ‘विकसित महाराष्ट्र’ या संकल्पनेला बळ देण्यात सोलापूरचा महत्त्वाचा वाटा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
या कामगिरीच्या गौरवार्थ सोलापूर जिल्ह्याला १६ कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मंजूर करण्यात आले आहे. या अनुदानाच्या वापराबाबतच्या सविस्तर अटी व मार्गदर्शक सूचना महाराष्ट्र संस्था फॉर ट्रान्सफॉर्मेशन अर्थात मित्र विभागाकडून जिल्हा प्रशासनाला कळविण्यात आल्या आहेत.
जिल्हा प्रशासनाने खासगी भांडवल उभारणीची ही गती कायम ठेवावी. तसेच जिल्ह्याचे सकल जिल्हा देशांतर्गत उत्पादन वाढविण्यासाठी अधिक महत्त्वाकांक्षी उद्दिष्टे निश्चित करावीत, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड