सोलापुरात कांद्याला उच्चांकी साडेपाच हजारांचा दर; आवक घटल्याने भावात तेजी
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दराने चांगलीच तेजी घेतली असून, कांद्याला प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. बाजार समितीत कांद्याची आवक तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली असून
kanda


सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)सोलापूरच्या सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या दराने चांगलीच तेजी घेतली असून, कांद्याला प्रतिक्विंटल ५ हजार ५०० रुपयांचा सर्वाधिक दर मिळाला. बाजार समितीत कांद्याची आवक तुलनेने कमी झाल्याने दरात वाढ झाली असून, आगामी काळात भाव आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी बाजार समितीत २८ हजार २२८ कांद्याच्या पिशव्यांची आवक झाली. कांद्याला कमाल ५ हजार ५०० रुपये, तर सर्वसाधारण २ हजार ९०० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. दर्जेदार म्हणजेच एक नंबर कांद्याला ५ हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत असून, सरासरी दर सुमारे ३ हजार रुपयांच्या आसपास आहे. मात्र, मोजक्याच मालाला साडेपाच हजार रुपयांचा दर मिळत असल्याने काही कांदा उत्पादकांमध्ये नाराजी आहे.

सोलापूर बाजार समितीत बुधवारी १४६ ट्रक कांद्याची आवक झाली. या कांद्याच्या लिलावातून तब्बल ४ कोटी २३ लाख ७४ हजार ८०० रुपयांची उलाढाल झाली, अशी माहिती बाजार समिती प्रशासनाने दिली.कांद्याची आवक कमी होत असताना मागणी कायम असल्याने दरात वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे आगामी दिवसांत कांद्याच्या बाजारभावात आणखी तेजी येणार का, याकडे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande