
सोलापूर, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित असलेल्या जागेवर अतिक्रमण करून तेथे आलिशान बंगला उभारल्याचा आरोप नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यांच्यावर करण्यात आला आहे. सुमारे ४ हजार चौरस फूट आरक्षित जागेवर अतिक्रमण केल्याचा आरोप करत विद्रोही संघटनेच्या कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला.
महापालिकेच्या शाळेसाठी आरक्षित जागेचा वापर अन्य कारणासाठी करण्यात आल्यास संबंधित जागेचे आरक्षण आणि महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण याबाबत गंभीर प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे या प्रकरणाची महापालिका प्रशासनाने तातडीने चौकशी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी विद्रोही संघटनेच्या वतीने करण्यात आली.
आरक्षित जागेवर प्रत्यक्ष अतिक्रमण झाले आहे का, संबंधित बांधकामाला परवानगी देण्यात आली आहे का आणि जागेच्या मालकी हक्काची कागदपत्रे काय आहेत, याची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
या प्रकरणात महापालिकेच्या बांधकाम विभागासह नगररचना आणि मालमत्ता विभागाने जागेची मोजणी करून कागदपत्रांची पडताळणी करावी. अतिक्रमण अथवा अनधिकृत बांधकाम आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी विद्रोही संघटनेने केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड