
पुणे, 20 ऑगस्ट (हिं.स.)।
पुणे जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना अंतराळ विज्ञानाची प्रत्यक्ष अनुभूती मिळावी, यासाठी निवडक विद्यार्थ्यांना अमेरिका आणि युरोपमधील विज्ञान संस्थांना भेट देण्याची संधी मिळणार आहे. या विद्यार्थ्यांना नासा, इस्रो आणि युरोपियन स्पेस एजन्सी (ईएसए) यांसारख्या संस्थांना भेट देण्याची संधी उपलब्ध होणार आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये विज्ञान आणि तंत्रज्ञानाची आवड निर्माण करणे, त्यांच्या वैज्ञानिक दृष्टिकोनाला चालना देणे आणि जागतिक स्तरावरील अंतराळ संशोधनाची माहिती प्रत्यक्ष अनुभवातून मिळवून देणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
या उपक्रमांतर्गत निवड झालेल्या विद्यार्थ्यांना अंतराळ संशोधन, उपग्रह तंत्रज्ञान आणि आधुनिक विज्ञानाच्या क्षेत्रातील विविध बाबी जाणून घेता येणार आहेत. नासा आणि ईएसएसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना भेट देण्याबरोबरच इस्रोच्या कार्याचीही विद्यार्थ्यांना माहिती मिळणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थ्यांना अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांना भेट देण्याची संधी मिळत असल्याने त्यांच्या शैक्षणिक आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु