

मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.)। मुंबईतील कुर्ला परिसरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हायड्रॉलिक क्रेन आणि जेसीबी कोसळून भीषण दुर्घटना घडली. पहाटे सुमारे तीन वाजता घडलेल्या या दुर्घटनेत एकूण दहा जण जखमी झाले असून, सर्व जखमींची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. क्रेनच्या मदतीने जेसीबी दुसऱ्या ठिकाणी हलविण्याचे काम सुरू असताना अचानक क्रेनचा तोल गेला आणि क्रेनसह जेसीबी खाली कोसळले.
कुर्ला आणि ट्रॉम्बे परिसरादरम्यान मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या प्रकल्पाचे काम सुरू आहे. या ठिकाणी पाडकामाची कारवाई करण्यासाठी क्रेन उभी करण्याचे काम सुरू होते. क्रेन माउंट करण्यासाठी जेसीबीचा वापर केला जात असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. क्रेन आणि जेसीबी खाली कोसळताना परिसरातील लगतच्या झोपड्यांवर, सम्राट अशोक नगर रस्त्यावर तसेच म्हाडाच्या इमारतीच्या कंपाउंडच्या भिंतीवरही त्याचा परिणाम झाला.
या दुर्घटनेत क्रेनचा काही भाग मध्य रेल्वेच्या हाय-टेन्शन ओव्हरहेड वायरवरही कोसळला. संबंधित मार्गावर केवळ मालगाड्यांची वाहतूक होत असल्याने लोकल रेल्वे सेवेला या घटनेचा फटका बसला नाही. दुर्घटनेमुळे म्हाडाच्या इमारतीच्या आवारात उभ्या असलेल्या तीन ते चार चारचाकी वाहनांचेही नुकसान झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच मुंबई महापालिका, पोलीस, अग्निशामक दल, स्थानिक प्रशासन आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सायन रुग्णालयात जगरुल्ला नबी मोहम्मद खान, अहमद नियाज अहमद, अतिकुर रेहमान, हकुम शेख, नुमान खान, रेहमान खान, सूरज गौर आणि अकबर यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर राजू गौड आणि आरती गौड यांना कुर्ला भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दरम्यान, क्रेन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, या दुर्घटनेचे नेमके कारण काय आणि क्रेन उभी करताना आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचा तपास प्रशासनाकडून सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule