गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगाराला १० जिजाऊ बस
रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । गुहागर एसटी आगाराला गणेशोत्सवापूर्वी १० जिजाऊ बस उपलब्ध होणार आहेत. आगामी गणेशोत्सवात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बसफेऱ्या वाढविण्यास तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवरील वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यास
गणेशोत्सवापूर्वी गुहागर एसटी आगाराला १० जिजाऊ बस


रत्नागिरी, 21 ऑगस्ट (हिं.स.) । गुहागर एसटी आगाराला गणेशोत्सवापूर्वी १० जिजाऊ बस उपलब्ध होणार आहेत. आगामी गणेशोत्सवात प्रवाशांची वाढणारी गर्दी लक्षात घेता अतिरिक्त बसफेऱ्या वाढविण्यास तसेच लांब पल्ल्याच्या मार्गांवरील वाहतूक सेवा अधिक सक्षम करण्यास मोठी मदत होणार आहे.

गुहागर आगाराला यापूर्वी काही लाल परी बस उपलब्ध झाल्याने लांब पल्ल्याच्या मार्गांवर सेवा सुरू ठेवण्यास हातभार लागला होता. मात्र, गेल्या काही काळापासून आगाराला मोठ्या प्रमाणावर जुन्या बसवर अवलंबून राहावे लागत आहे. ग्रामीण भागातील प्रवाशांसाठी नियमित वस्तीच्या फेऱ्या चालविताना उपलब्ध बसचा मोठा वापर होत असल्याने दर्जेदार आणि नव्या बसची गरज सातत्याने जाणवत होती.

आगारातील काही महत्त्वाच्या लांब पल्ल्याच्या बसफेऱ्याही यापूर्वी बंद करण्यात आल्या होत्या. आता १० नव्या जिजाऊ बस उपलब्ध होणार असल्याने या मार्गांवरील सेवा पूर्ववत करण्यास तसेच गणेशोत्सवाच्या काळात वाढीव फेऱ्या नियोजित करण्यास आगार प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

गणेशोत्सव काळात गुहागर तालुक्यात मुंबई, पुणे आणि अन्य शहरांमधून मोठ्या संख्येने चाकरमानी दाखल होतात. त्यामुळे या कालावधीत एसटी वाहतुकीवर मोठा ताण येतो. प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन गुहागर आगाराकडून दरवर्षी जादा बसफेऱ्या सोडल्या जातात. मात्र, स्थानिक पातळीवर बसची संख्या अपुरी पडत असल्याने इतर आगारांमधून अतिरिक्त बस मागविण्याची वेळ प्रशासनावर येते.

नव्या जिजाऊ बसमुळे गणेशोत्सवाच्या काळात गुहागर आगाराच्या वाहतूक व्यवस्थेला निश्चितच बळ मिळणार आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande