
यवतमाळ, 21 ऑगस्ट (हिं.स.)। यंदा जुलै महिन्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामात पेरणी करणाऱ्या ४१ हजार ५५६ शेतकरी बाधित झाले आहे. तब्बल ३६ हजार १३५ हेक्टर पिकांना फटका बसला असून, ३१५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने ८४० हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे.
यंदा मॉन्सूनचा विलंब शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसला होता. परिणामी, सुरवातीला खरीप हंगामातील पेरण्यासुद्धा खोळंबल्या होत्या. जून महिन्याच्या शेवटी कोसळलेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी लागवडीची गडबड केली. विलंबाने का होईना आठ लाख ६७ हजार ९९० हेक्टर क्षेत्रावर कापूस, सोयाबीन, तूर, ऊस, कडधान्य, फळबाग, भाजीपाला आदींची लागवड झाली होती. जून महिन्यात पावसाची तूट निर्माण मोठ्या प्रमाणात निर्माण झाली होती. ही तूट जुलै महिन्यात भरून निघेल, अशी शक्यता होती. मात्र, काही दिवस पावसाने विश्रांती घेतली, तर काही दिवस पावसाने हजेरी लावली होती. सरासरीहून कमी कोसळलेल्या पावसानंतरही पिकांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नव्हते. मात्र, जुलै महिन्यात शेवटच्या तीन दिवसात जिल्ह्याला पावसाने झोडपून काढले. अवघ्या २४ तासात तब्बल १३५ मिमी हून अधिक पावसाची नोंद घेण्यात आली.
छोट्या, मोठ्या प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली. काही प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. मुसळधार पावसामुळे नदी, नाले ओसंडून वाहत होते. विशेष म्हणजे जिल्ह्यातील अनेक मार्ग ठप्प पडले होते. या पावसामुळे तब्बल ५३५ गावातील ४१ हजार ५५६ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले. यात प्रामुख्याने ३५ हजार २७७.८२ हेक्टरवरील कोरडवाहू पिकाखालील क्षेत्राचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बागायत पिकाखालील ७.९०, बहुवार्षिक फळ क्षेत्र ९.४०, तर ८४०.२७ हेक्टर जमीन खरडली, असे मिळून ३६ हजार १३५.३० हेक्टरवरील पिकांना फटका बसला. पावसामुळे बाधित झालेल्या विविध शेतीपिके व फळपिकांच्या नुकसानीचा ३१५ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी पाठविण्यात आला आहे.
तीन तालुक्यात नुकसान नाही
जिल्ह्यात जुलै महिन्याच्या शेवटच्या तीन दिवसांत कोसळलेल्या पावसाने तब्बल १३ तालुक्याला झोडपले. या तालुक्यातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर पुसद, उमरखेड आणि मारेगाव तालुक्यातील शेतकर्!यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान झाले नाही. या तालुक्यात केलेल्या सर्वेक्षणात ही बाब उघडकीस आली आहे.
तालुकानिहाय नुकसान झालेले क्षेत्र (हेक्टरी)
यवतमाळ - ११३३.३२; कळंब - १२२८.००; घाटंजी - ४३८७.६५; राळेगाव - ३४.५५; दारव्हा - ८९६५.००; नेर - ७३५२.१०; आर्णी - ५७५२;
बाभूळगाव - १८८२.२१; दिग्रस - ९३.८८; महागाव - ४९२.४५; पांढरकवडा - १९५.००; वणी - १५३६.१९; झरीजामणी - १५३६.१९ एकूण ३५२७७.८२
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी