यवतमाळ : ‘महा वॉकथॉन’मध्ये हजारो नागरिकांचा सहभाग
यवतमाळ, 21 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिस
यवतमाळमध्ये ‘वॉक फॉर वॉटर’साठी उसळला जनसागर! ‘महा वॉकथॉन’मध्ये हजारो नागरिकांचा सहभाग


यवतमाळ, 21 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्राच्या जलसंधारण क्षेत्राला दूरदृष्टी देणारे राज्याचे माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त आणि जलसंधारण दिनाचे औचित्य साधून यवतमाळ येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकथॉन’ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. समता मैदानातून सकाळी 6 वाजता सुरू झालेल्या या वॉकथॉनमध्ये 20 हजारांहून अधिक नागरिकांनी सहभाग घेत ‘माती वाचवा, पाणी जपा आणि सुरक्षित भविष्य घडवा’चा संदेश दिला.

राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच ‘वॉक फॉर वॉटर’चा संदेश देत संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी ‘महा वॉकथॉन’चे आयोजन करण्यात आले. 15 ऑगस्टपासून सुरू असलेल्या ‘जलसंधारण सप्ताहा’ची सांगता या वॉकथॉनने झाली.

यावेळी आमदार किसन वानखेडे, नगराध्यक्ष प्रियदर्शनी उइके, जिल्हाधिकारी विकास मीना, जलसंधारण अधिकारी भुमेश दमाहे, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार, श्रीधर मोहोड, जिल्हाप्रमुख गजानन डोमाळे, राजुदास जाधव, यशवंत पवार, आशिष कुलसंगे, समन्वयक संजय हातगावकर आदी मान्यवर सहभागी झाले.

25 हजार नागरिकांची ऑनलाइन नोंदणी

वॉकथॉनसाठी यवतमाळ जिल्ह्यातून तब्बल 25 हजार स्पर्धकांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. त्यापैकी 20 हजारांहून अधिक नागरिक प्रत्यक्ष वॉकथॉनमध्ये सहभागी झाले. माध्यमिक शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थी, शासकीय अधिकारी-कर्मचारी, तरुण-तरुणी तसेच विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विशेषतः ‘जेन झी’चा सहभाग लक्षणीय ठरला.

कार्यक्रमाच्या प्रारंभी झुंबा, योग आणि नृत्याचे सादरीकरण झाले. त्यानंतर उपस्थितांना जलसंधारणाची शपथ देण्यात आली. सकाळी 7 वाजता तीन किलोमीटरच्या वॉकथॉनला सुरुवात झाली. शहरातील विविध मार्गांवरून नागरिकांनी ‘पाणी वाचवा, माती वाचवा, भविष्य घडवा’चा संदेश देत पायी प्रवास केला.

28 स्पर्धकांना 1 लाख 25 हजारांची बक्षिसे

वॉकथॉननंतर ईश्वरचिठ्ठीद्वारे विजेत्यांची निवड करण्यात आली. संदीप बुटले यांना प्रथम क्रमांकासाठी 25 हजार रुपये, वेद यादव यांना द्वितीय क्रमांकासाठी 15 हजार रुपये, तर पायल रेठी यांना तृतीय क्रमांकासाठी 10 हजार रुपये आणि गौरवचिन्ह देण्यात आले. याशिवाय 25 विजेत्यांना प्रत्येकी तीन हजार रुपयांचे प्रोत्साहनपर बक्षीस देण्यात आले. अशा प्रकारे एकूण 28 स्पर्धकांना 1 लाख 25 हजार रुपयांची बक्षिसे वितरित करण्यात आली.

वॉकथॉनमध्ये सहभागी झालेल्या सर्व नागरिकांना ई-प्रमाणपत्र देण्यात आले असून, त्यांना ‘जलदूत’ म्हणून विशेष ओळख देण्यात आली.

प्रजासत्ताक दिनापर्यंत जलसंधारण अभियान

मंत्री संजय राठोड यांच्या संदेशानुसार, हा उपक्रम केवळ जलसंधारण सप्ताहापुरता मर्यादित न राहता स्वातंत्र्य दिनापासून 26 जानेवारी 2027 या प्रजासत्ताक दिनापर्यंत ‘जलसंधारण अभियान’ म्हणून सुरू राहणार आहे. या माध्यमातून जलयुक्त शिवार 2.0, गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार, अमृत सरोवर तसेच प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.

हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व आणि मातीचे संवर्धन याबाबत जनजागृती करून राज्यव्यापी लोकचळवळ उभारणे हा या अभियानाचा उद्देश असल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande