अमरावती : महर्षी पब्लिक स्कूलच्या हलगर्जीपणावर अपर आदिवासी आयुक्तांचा ठपका
५४५ विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन सुरू अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महर्षी पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर याच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच गंभी
महर्षी पब्लिक स्कूलच्या हलगर्जीपणावर अपर आदिवासी आयुक्तांचा ठपका ५४५ विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन सुरू


५४५ विद्यार्थ्यांचे इतर शाळांत समायोजन सुरू

अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महर्षी पब्लिक स्कूलमध्ये १५ ऑगस्ट रोजी देण्यात आलेल्या जेवणातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याच्या घटनेनंतर आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर याच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच गंभीर बनले आहे. या प्रकरणात महर्षी पब्लिक स्कूल प्रशासनाने हलगर्जीपणा केल्याचा ठपका अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत यांनी ठेवला आहे. शाळेला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली असून, शाळेची मान्यता रद्द करण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.विषबाधेनंतर राजेश बेठेकर या आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर अन्य पाच विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या घटनेमुळे आदिवासी समाजात तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असून, विविध आदिवासी संघटनांनी शाळा प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. महर्षी पब्लिक स्कूलची मान्यता तातडीने रद्द करण्यात यावी, अशी मागणी सर्व स्तरांतून केली जात आहे.

दरम्यान, शाळेतील ५४५ विद्यार्थ्यांचे इतर शाळांमध्ये समायोजन करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी प्रशासनाकडून पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करताना शाळा प्रशासनाच्या कार्यपद्धतीतील अनेक बाबी समोर आल्याचे अपर आदिवासी आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत आवश्यक ती खबरदारी न घेतल्याचा आरोप शाळेवर करण्यात आला आहे. त्यामुळे आता कारणे दाखवा नोटीसला शाळा प्रशासन काय उत्तर देते आणि त्यानंतर प्रशासन कोणती कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजेश बेठेकरच्या मृत्यूला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणीही आदिवासी संघटनांकडून करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने महर्षी पब्लिक स्कूलची मान्यता कायम राहणार की रद्द होणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande