राज्यात ११,५८७ ‘शेतकरी मित्र’ नियुक्त होणार
शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान पोहोचणार अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने राज्यभरात ११ हजार ५८७ ‘शेतकरी मित्र’ नियुक्त
जिल्ह्यासह राज्यात कृषी विस्ताराला वेग  शेतकरी मित्रांची मानधन तत्त्वावर दोन वर्षांसाठी नियुक्ती


शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत आधुनिक शेतीचे तंत्रज्ञान पोहोचणार

अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। नवीन संशोधन, आधुनिक तंत्रज्ञान आणि सुधारित शेती पद्धती थेट शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी कृषी विभागाने राज्यभरात ११ हजार ५८७ ‘शेतकरी मित्र’ नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अमरावती जिल्ह्यासह राज्यातील कृषी विस्ताराच्या कामाला मोठी गती मिळण्याची अपेक्षा आहे.

‘आत्मा’ यंत्रणेच्या निधीतून शेतकरी मित्रांना दरमहा १ हजार ५०० रुपये, म्हणजेच वर्षाला १८ हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. हे मानधन दर तीन महिन्यांनी एकत्रितपणे अदा केले जाणार आहे. मात्र, शेतकरी मित्रांना प्रवास खर्च अथवा अन्य कोणतेही भत्ते मिळणार नाहीत.

दरवर्षी होणार कामाचे मूल्यांकन

शेतकरी मित्रांच्या कामाचे दरवर्षी मूल्यांकन केले जाणार असून, त्यासाठी एकूण १२५ गुण निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये तांत्रिक बाबींसाठी १००, तर उल्लेखनीय कामासाठी २५ गुण ठेवण्यात आले आहेत. शेतीशाळेतील उपस्थिती, विविध सर्वेक्षणांमधील सहभाग तसेच ग्रामसभेतील सहभाग यांसह अन्य निकषांच्या आधारे मूल्यांकन केले जाणार आहे.

स्थानिक शेतकऱ्यांना प्राधान्य

शेतकरी मित्र म्हणून नियुक्तीसाठी उमेदवार संबंधित गावाच्या कार्यक्षेत्रातील रहिवासी आणि शेतकरी असणे बंधनकारक आहे. निवड प्रक्रियेत किमान ३० टक्के महिलांना संधी दिली जाणार आहे. तसेच २५ ते ६० वर्षे वयोगटातील, किमान बारावी उत्तीर्ण आणि शेतकरी संघटन कौशल्य असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात ही नियुक्ती दोन वर्षांसाठी करण्यात येणार आहे. ग्राम कृषी विकास समितीच्या ठरावानंतर पारदर्शक पद्धतीने निवड प्रक्रिया राबविली जाणार आहे. या नियुक्त्या कायमस्वरूपी नसून, दर तीन महिन्यांनी कामाचा आढावा घेण्यात येईल. त्यानंतर सादर होणाऱ्या अहवालाच्या आधारे मानधन अदा केले जाणार आहे.

‘शेतकरी मित्रां’वर महत्त्वाची जबाबदारी

शेतकरी मित्रांकडून कृषी योजनांचा प्रचार व प्रसार, शेतकरी गटांची बांधणी, शेतीशाळांसाठी शेतकऱ्यांची निवड, नैसर्गिक शेतीचा प्रसार तसेच विविध कृषी मोहिमांमध्ये सहभाग घेण्याची कामे केली जाणार आहेत. याशिवाय शेतकरी सुविधा केंद्रांची स्थापना करण्यासाठीही ते सहकार्य करणार आहेत.

या माध्यमातून शासनाच्या कृषी योजना, तंत्रज्ञान आणि आधुनिक शेतीविषयक माहिती शेतकऱ्यांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचण्यास मदत होणार असून, ग्रामीण भागातील कृषी विस्तार यंत्रणेला अधिक बळकटी मिळणार आहे.--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande