
२५ ऑगस्टपासून आठवड्यातून चारच दिवस उड्डाण
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)। अमरावतीच्या बेलोरा विमानतळावरून मुंबईसाठी सुरू असलेल्या विमानसेवेच्या वेळापत्रकात पुन्हा एकदा मोठा बदल करण्यात आला आहे. २५ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत आता आठवड्यातून केवळ चार दिवसच अमरावती-मुंबई विमान उड्डाण करणार असल्याची अधिकृत घोषणा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे केली आहे. एअरलाइन्सच्या अंतर्गत तांत्रिक कारणांमुळे हा बदल करण्यात आला असून, आता सोमवार, बुधवार, शुक्रवार आणि रविवार या चार दिवशीच विमानसेवा उपलब्ध असेल.
आता पुन्हा कपात
अमरावती ते मुंबई दरम्यान १६ एप्रिल २०२५ ते एप्रिल २०२६ या एका वर्षाच्या कालावधीत 'अलायन्स एअरलाइन्स' कंपनीमार्फत आठवड्यातून चार दिवस विमानसेवा दिली जात होती. प्रवाशांचा वाढता प्रतिसाद पाहता, मे २०२६ नंतर या विमानसेवेचे दिवस वाढवून ती आठवड्यातून ५ दिवस करण्यात आली होती. मात्र, आता कंपनीला भेडसावणाऱ्या काही तांत्रिक अडचणींमुळे २५ ऑगस्टपासून या विमान उड्डाणांच्या संख्येत पुन्हा कपात करण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी