‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ला हिंगोलीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मृद व जलसंधारणाची शपथ; ‘पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा’चा संदेश हिंगोली, 21 ऑगस्ट (हिं.स.)। मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर व
अ


मृद व जलसंधारणाची शपथ; ‘पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा’चा संदेश

हिंगोली, 21 ऑगस्ट (हिं.स.)। मृद व जलसंधारण, जलस्रोतांचे संवर्धन आणि पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने हिंगोली शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘महावॉकेथॉन वॉक फॉर वॉटर’ अभियानाचा उत्साहात शुभारंभ झाला. या उपक्रमाला अधिकारी, कर्मचारी, तरुणाई आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

“महा-वॉकेथॉनच्या माध्यमातून मृद व जलसंधारण करा, पाणी वाचवा, जलस्रोतांचे संरक्षण करा आणि पर्यावरणाचे संवर्धन करा, हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. मृद व जलसंधारण ही शाश्वत विकासाची महत्त्वाची बाब असून, पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले.

आमदार संतोष बांगर, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी विनोद निर्वळ यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्रशाला मैदानावरून हिरवी झेंडी दाखवून महा-वॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली.

उद्घाटनप्रसंगी आमदार संतोष बांगर यांनी उपस्थितांना “पाणी अडवा, पाणी जिरवा” तसेच “झाडे लावा, झाडे जगवा” असा संदेश दिला.

शासकीय इमारतींवर रेन वॉटर हार्वेस्टिंगचे आवाहन

जलसंधारण अभियानांतर्गत 15 ऑगस्ट 2026 ते 26 जानेवारी 2027 या कालावधीत प्रत्येक विभाग प्रमुखाने आपल्या शासकीय इमारतीवर रेन वॉटर हार्वेस्टिंगची व्यवस्था करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व अधिकाऱ्यांना केले.

यावेळी मृदसंधारण, जलसंधारण, पाण्याचा काटकसरीने वापर, जलस्रोतांचे संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचा संकल्प करण्यात आला. उपस्थित अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.

जलजागृतीपर घोषणांनी दुमदुमला परिसर

महा-वॉकेथॉनचा मार्ग जिल्हा परिषद प्रशाला मैदान, नवीन न्यायालय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय, नांदेड नाका, इंदिरा गांधी चौक, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, निर्मल कॅफे आणि पाण्याची टाकी असा होता. या मार्गाने मार्गक्रमण केल्यानंतर पुन्हा जिल्हा परिषद प्रशाला मैदान येथे महा-वॉकेथॉनचा समारोप करण्यात आला.

वॉकेथॉनदरम्यान नागरिक आणि तरुणाईने जलजागृतीपर घोषणा देत पाणी संवर्धन, जलस्रोतांचे संरक्षण, मृदक्षय रोखणे, पावसाच्या पाण्याचे संधारण आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

महा-वॉकेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पहिल्या दहा विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमास जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे जिल्हा जलसंधारण अधिकारी बी. एम. शिंदे, सहायक जिल्हा जलसंधारण अधिकारी विशाल चव्हाण, वसमतचे उपविभागीय जलसंधारण अधिकारी विकास याचावाड, जलसंधारण अधिकारी अनंत घोलकर, विठ्ठल काळबांडे, उमेश अनमुलवाड, पंकज बारहाते, चैताली मेंते, श्रद्धा डाकोरे, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक पवन माने यांच्यासह मृद व जलसंधारण विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

------------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande