
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.) | महर्षी पब्लिक स्कूलमधील आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर यांच्या मृत्यू प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. राजेशच्या कुटुंबीयांनी अमरावतीतील गाडगे नगर पोलीस ठाण्यात धाव घेत महर्षी पब्लिक स्कूलचे संचालक प्रशांत राठी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. राजेशच्या मृत्यूला शाळा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोप करीत संचालकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली आहे.
राजेश बेठेकर हा महर्षी पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेत होता. त्याच्या प्रकृतीकडे शाळा प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही. तसेच आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात हलगर्जीपणा करण्यात आल्याने राजेशचा मृत्यू झाल्याचा गंभीर आरोप त्याच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या भूमिकेची सखोल चौकशी करण्यात यावी, राजेशच्या प्रकृतीबाबत शाळेकडून कोणती काळजी घेण्यात आली, त्याला वेळेत उपचार मिळाले का आणि संबंधितांकडून काही निष्काळजीपणा झाला का, याची चौकशी करण्याची मागणी कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली आहे.
दरम्यान, राजेशच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण असून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. पोलिसांनी तक्रारीची दखल घेत प्रकरणाची चौकशी सुरू केली असून चौकशीतून नेमकी वस्तुस्थिती समोर येण्याची शक्यता आहे.
या प्रकरणामुळे महर्षी पब्लिक स्कूल प्रशासनाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राजेशच्या कुटुंबीयांनी न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी