बीडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपच्या रागातून जोडप्याला मारहाण, दागिने लुटले
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करत सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची आणि शेतातील कडब्याची गंज जाळून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना पाटोदा येथे घडली
बीडमध्ये लिव्ह-इन रिलेशनशिपच्या रागातून जोडप्याला मारहाण, दागिने लुटले


बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याच्या रागातून घरात घुसून दाम्पत्याला मारहाण करत सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेल्याची आणि शेतातील कडब्याची गंज जाळून सुमारे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान केल्याची घटना पाटोदा येथे घडली. या प्रकरणी तिघांविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महेश काकासाहेब बावने (वय ३७, रा. वाघीरा, सध्या रा. क्रांती नगर, पाटोदा) यांना पत्नी, दोन मुले असून ते अश्विनी सुरवसे यांच्यासोबत कायदेशीर कराराद्वारे गेल्या चार महिन्यांपासून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत आहेत. फिर्यादीनुसार आकाश खंडेराव बाबर, गजानन खंडेराव बाबर आणि रोहन बारीकराव बाबर (सर्व रा. वैद्यकिन्ही, ता. पाटोदा) हे फिर्यादीच्या पाटोदा येथील घरी आले. त्यांनी जुन्या व्यवहारावरून व लिव्ह-इन रिलेशनशिपच्या कारणावरून वाद घालत महेश बावने यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यावेळी वाद सोडवण्यासाठी आलेल्या अश्विनी यांनाही मारहाण करत त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मणीमंगळसूत्र व नेकलेस जबरदस्तीने काढून नेले.

त्यानंतर आरोपींनी शेतातील कडब्याच्या गंजीला आग लावली. या आगीत सुमारे ४ हजार कडब्याच्या पेंढ्या, ३० पीव्हीसी पाईप आणि शेती अवजारे जळून खाक झाली असून यात अंदाजे साडेतीन लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणी महेश बावने यांच्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपींविरुद्ध पाटोदा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये जबरी चोरी, मारहाण आणि आग लावून नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार बाळासाहेब शेषेराव वाघ करत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande