धाराशिव येथे २५ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद
धाराशिव २१ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६चे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्
धाराशिव येथे २५ ऑगस्टला जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद


धाराशिव २१ ऑगस्ट (हिं.स.) : जिल्ह्यातील उद्योग क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्याबरोबरच गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद-२०२६चे आयोजन करण्यात आले आहे.जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली आणि सह आयुक्त (उद्योग),छत्रपती संभाजीनगर विभाग,स्वप्नील राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद २५ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत रायगड उत्सव हॉल,डी-मार्टसमोर, धाराशिव येथे होणार आहे.

जिल्हास्तरावर गुंतवणूक आकर्षित करणे, जिल्हास्तरीय गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एकत्रित व्यासपीठ उपलब्ध करून देणे,तसेच जिल्ह्याला विकासाचा केंद्रबिंदू मानून जिल्ह्याच्या आणि राज्याच्या विकासाला चालना देणे,हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

परिषदेत जिल्ह्यातील प्रमुख उद्योग क्षेत्रांबाबत चर्चासत्र आयोजित करण्यात येणार आहे.त्याचबरोबर गुंतवणुकीच्या संधी,क्षमता असलेल्या इतर क्षेत्रांतील गुंतवणूक व व्यवसायाच्या संधी याबाबत चर्चा होणार आहे. सामंजस्य करारांवर स्वाक्षरी करण्याचा कार्यक्रम तसेच उद्योजकांचे अनुभव कथन यांचाही परिषदेत समावेश करण्यात आला आहे.

या परिषदेस महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,मैत्री कक्ष,उद्योग आयुक्तालय, मुंबई,जिल्ह्यातील स्टेट बँक ऑफ इंडिया,उद्योजक संघटना,महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र,मिटकॉन, कौशल्य विकास व रोजगार विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, महावितरण कार्यालय, धाराशिव आदी कार्यालयातील अधिकारी उपस्थित राहणार आहेत.हे अधिकारी परिषदेस उपस्थित उद्योजकांना मार्गदर्शन करणार आहेत.

जिल्ह्यात नव्याने स्थापित होणाऱ्या उद्योग घटकांसोबत या परिषदेत सामंजस्य करार करण्यात येणार आहेत.या माध्यमातून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होऊन रोजगारनिर्मितीला चालना मिळणार आहे.जिल्ह्यातील उद्योग व व्यवसाय क्षेत्राला नवी दिशा देणाऱ्या या परिषदेस मोठ्या संख्येने उद्योजकांनी उपस्थित राहावे,असे आवाहन सहायक आयुक्त (उद्योग व सेवा),जिल्हा उद्योग केंद्र, धाराशिव यांनी केले आहे.

*******

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande