
जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदेत 203 उद्योजकांशी करार
कोल्हापूरला औद्योगिक विकासाची नवी दिशा देण्याचा निर्धार
कोल्हापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषद शुक्रवारी हॉटेल रसिका येथे पार पडली. या परिषदेत 203 उद्योजकांसोबत एकूण 6 हजार 105 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. या गुंतवणुकीतून 20 हजार 835 रोजगारांची निर्मिती अपेक्षित आहे.
उद्योग क्षेत्राची कार्यक्षमता वाढवणे ही काळाची गरज असून, ही गुंतवणूक परिषद कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला नवी दिशा देणारी ठरेल, असा विश्वास आमदार अशोकराव माने यांनी व्यक्त केला. युवकांनी नोकऱ्या मागणारे नव्हे, तर नोकऱ्या देणारे उद्योजक बनावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हा उद्योग व सेवा विभागाच्या वतीने आयोजित या परिषदेला जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती. पुणे उद्योग व सेवा विभागाचे सहआयुक्त संदीप रोकडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक अधिकारी उमेश देशमुख, जिल्हा उद्योग व सेवा विभागाच्या उपायुक्त डॉ. विद्या कुलकर्णी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, बँक अधिकारी आणि जिल्ह्यातील उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
परिषदेत उद्योजकांसोबत सामंजस्य करार करण्यात आले. तसेच जिल्हा उद्योग पुरस्कारांचे वितरण करून यशस्वी उद्योजकांचा गौरव करण्यात आला. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेत कोल्हापूर जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाल्याबद्दल उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बँक अधिकाऱ्यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
कोल्हापूरला औद्योगिक विकासात अग्रेसर करण्याचे आवाहन
आमदार अशोकराव माने यांनी सांगितले की, उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी शासन आणि प्रशासनाच्या माध्यमातून विविध प्रयत्न सुरू आहेत. युवकांनी उद्योग विभागाच्या योजनांचा लाभ घेऊन आर्थिक उन्नती साधावी. कोल्हापूर जिल्ह्यात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून आगामी काळात जिल्हा उद्योग क्षेत्रात राज्यात अग्रेसर बनेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उद्योग विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी योजनांवर आधारित पुस्तक तयार करण्याची सूचनाही त्यांनी केली.
‘कोल्हापूरला आयटी डेस्टिनेशन बनवूया’
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी कोल्हापुरात रस्ते आणि विमानसेवेचा विस्तार होत असल्याने उद्योगधंद्यांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण होत असल्याचे सांगितले. उद्योजकांच्या अडचणी जाणून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हास्तरीय गुंतवणूक परिषदा आणि उद्योग मित्र बैठका आयोजित केल्या जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
“कोल्हापूरच्या औद्योगिक क्रांतीसाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करूया. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील उद्योजक तयार करून स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करूया. कोल्हापूर हे माहिती तंत्रज्ञान क्षेत्राचे डेस्टिनेशन बनविण्यासाठी प्रयत्न करूया,” असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले.
2025 मध्ये 4,156 कोटींची गुंतवणूक
डॉ. राठोड यांनी जिल्ह्यातील गुंतवणुकीची आकडेवारीही यावेळी मांडली. 2025 मध्ये 4 हजार 156 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली असून 147 उद्योगांशी सामंजस्य करार करण्यात आले. त्यापैकी 88 उद्योग घटकांचे उत्पादन सुरू झाले असून त्यातून 1 हजार 489 कोटी रुपयांची प्रत्यक्ष गुंतवणूक आणि 3 हजार 465 रोजगार निर्माण झाले आहेत.
यापूर्वी 2024 मध्ये जिल्ह्यात 1 हजार 531 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली होती. 52 उद्योगांशी सामंजस्य करार झाले, त्यापैकी 47 उद्योगांचे उत्पादन सुरू झाले. यातून 1 हजार 165 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 2 हजार 659 रोजगारांची निर्मिती झाली.
सूक्ष्म, लघू, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना संधी
सुरेंद्र जैन यांनी सांगितले की, सर्किट बेंच आणि अंबाबाई विकास आराखड्यामुळे कोल्हापूरच्या विकासाला नवी गती मिळत आहे. जिल्ह्यात होणारी औद्योगिक गुंतवणूक सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
संदीप रोकडे यांनी जिल्ह्यात सूक्ष्म, लघू, मध्यम तसेच मोठ्या उद्योगांसाठी आणि विस्तार करणाऱ्या उद्योगांसाठी मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे सांगितले. उद्योगांना भांडवल आणि बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या उद्योग विभागामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
परिषदेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांनी मार्गदर्शन केले. शासन, प्रशासन, बँका आणि औद्योगिक संघटनांमधील समन्वय अधिक मजबूत करून गुंतवणुकीसाठी पोषक वातावरण निर्माण करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
----------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar