
परभणी, 21 ऑगस्ट (हिं.स.)। सर्वोच्च न्यायालयाने 13 जुलै 2026 रोजी स्वत:हून दखल घेतलेल्या याचिका व रिट याचिकेच्या अनुषंगाने आज राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५२-के वरील गंगाखेड–परभणी मार्गालगत असलेली अतिक्रमणे हटविण्याची कार्यवाही गंगाखेड येथे प्रशासनाच्या वतीने सुरू करण्यात आली. या मोहिमेस उपविभागीय अधिकारी जीवराज डापकर, मुख्याधिकारी, तहसीलदार, पोलीस निरीक्षक, महावितरणचे अधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अतिक्रमण निर्मूलनासाठी सकाळपासून प्रशासनाची यंत्रणा सज्ज होती. मात्र, अतिक्रमणधारकांनी स्वतःची अतिक्रमणे काढून घेतल्यास अनावश्यक नुकसान टाळता येईल, अशी विनंती केली. या विनंतीचा विचार करून प्रशासनाने अतिक्रमणधारकांना स्वतःहून अतिक्रमणे हटविण्यासाठी आजचा एक दिवस वेळ दिला आहे. याबाबत सर्व संबंधित अतिक्रमणधारकांना पुन्हा सूचना देण्यात आल्या असून, त्यांनी अतिक्रमणे तात्काळ स्वतःहून काढून घ्यावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, गंगाखेड नगरपालिकेकडून अतिक्रमण हटविण्याच्या कार्यवाहीसाठी आवश्यक ट्रॅक्टर व जेसीबी यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या आहेत.
आवश्यक यंत्रसामग्री उपलब्ध झाल्यानंतर कार्यवाहीला अधिक गती मिळणार आहे. उद्या सकाळी १०.३० वाजता अतिक्रमण निर्मूलन मोहीम पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची सूचना प्रशासनाने सर्व संबंधितांना दिली आहे. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आपली अतिक्रमणे वेळेत स्वतःहून हटवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासन, पोलीस, उपप्रादेशिक परिवहन विभाग आणि संबंधित यंत्रणेच्या योग्य समन्वयातून राष्ट्रीय व राज्य महामार्गालगत असलेली अनधिकृत बांधकामे व अतिक्रमणे 31 ऑगस्टपर्यंत निष्कासित करण्याचे निर्देश जिल्हाधिका-यांनी यंत्रणेला दिले आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis