
अमरावती, 21 ऑगस्ट (हिं.स.)
प्रधानमंत्री पीकविमा योजनेला खरीप हंगामात मारेगाव तालुक्यात शेतकर्!यांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळालेला नाही. तालुक्यात सुमारे ४५ हजार हेक्टर क्षेत्रावर खरिप पिकांची पेरणी झाली असली, तरी मुदतीपर्यंत (ता. १०) केवळ ५ हजार २३५ हेक्टर क्षेत्राचाच पीकविमा उतरविण्यात आला आहे. त्यामुळे तालुक्यातील बहुतांश शेतकरी पीकविमा संरक्षणापासून दूर राहिल्याचे स्पष्ट चित्र आहे. मारेगाव तालुक्यात एकूण २० हजार १५३ शेतकरी असून, त्यापैकी केवळ २ हजार ८२९ शेतक-यांनीच पीकविमा काढण्यासाठी नोंदणी केली आहे. गतवर्षीच्या तुलनेत किंवा एकूण पेरणी क्षेत्राचा विचार करता ही संख्या अतिशय अत्यल्प आहे. पीकविमा भरल्यानंतरही नुकसानभरपाई वेळेवर न मिळणे, तांत्रिक अडचणी आणि जाचक अटींमुळे शेतक-यांमध्ये या योजनेबद्दल उदासीनता दिसून येत आहे. एकूण शेतकरी संख्या २०, १५३ असून खरीप पेरणी क्षेत्र ४५ हजार हेक्टर आहे. विमा उतरवलेले क्षेत्र ५ हजार २३५ हेक्टर असून सहभागी शेतकरी केवळ २ हजार ८२९ आहेत.
प्रधानमंत्री पीकविमा योजनेची अंतिम मुदत १० ऑगस्टपर्यंत होती. मुदतीपूर्वी जास्तीत जास्त शेतकर्!यांनी नोंदणी करावी, यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करण्यात आले. तांत्रिक अडचणी आणि जनजागृतीची गरज लक्षात घेऊन आगामी काळात जनजागृती मोहीम अधिक तीव्र केली जाईल. - दिपाली खवले, तालुका कृषी अधिकारी, मारेगाव.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी