
एकाच स्वस्त धान्य दुकानाकडे ६१९ रेशन कार्ड वळविल्याचा आरोप; पुरवठा निरीक्षक निलंबित
वर्धा, २१ ऑगस्ट (हिं.स.) : वर्धा तहसील कार्यालयातील धान्य पुरवठा विभागात तब्बल ३१ लाख ७७ हजार ७९१ रुपयांचा गैरव्यवहार उघडकीस आला असून, या प्रकरणी वर्धा शहर पोलीस ठाण्यात निरीक्षण अधिकारी मनीषा रमेश माजरखेडे आणि सेल्समन योगेश भाले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नायब तहसीलदार अजय अनंताजी धर्माधिकारी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी ही कारवाई केली.
या प्रकरणातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिसांकडून रात्रीपासून कारवाई सुरू करण्यात आली आहे. वर्धा शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार नागेशकुमार चतारकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आरोपी मनीषा माजरखेडे घरी आढळून आल्या नाहीत. त्यांचा मोबाईल फोनही बंद असून त्या फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आले आहे.
एकाच दुकानाकडे ६१९ रेशन कार्ड वळविल्याचा आरोप
प्राथमिक तपासानुसार, आरोपी अधिकाऱ्याने स्वतःच्या लॉगिन आयडीचा कथित गैरवापर करून ६१९ रेशन कार्ड बेकायदेशीरपणे एका स्वस्त धान्य दुकानाकडे वळविले. त्यानंतर अतिरिक्त गव्हासह तांदूळ आणि ज्वारीचा मंजूर कोटा देण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रक्रियेमुळे शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे चौकशीत समोर आले आहे.
या प्रकरणी अत्यावश्यक वस्तू कायदा तसेच भारतीय न्याय संहितेतील संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.
पुरवठा निरीक्षक अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई
दरम्यान, धान्य गैरव्यवहार प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकारी वान्मथी सी. यांनी पुरवठा निरीक्षक अधिकारी मनीषा माजरखेडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे. शासकीय कर्तव्यात कसूर करणे, नागरी सेवा नियमांचा भंग करणे आणि पुरवठा विभागातील धान्य वाटपात अनियमितता केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियमावलीतील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. निलंबनाच्या कालावधीत नियमानुसार त्यांना जीवननिर्वाह भत्ता देण्यात येणार असून, सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यासही मनाई करण्यात आली आहे.
रेशन वितरणातील गैरव्यवहाराची चौकशी
वर्धा जिल्ह्यातील रेशन धान्य वितरण प्रणालीत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याच्या तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या होत्या. गरीब आणि गरजू लाभार्थ्यांसाठी असलेले धान्य काळ्या बाजारात विकले जात असल्याचे तसेच धान्य साठ्यात मोठ्या प्रमाणात तफावत असल्याचे आरोप करण्यात आले होते.-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी