
नाशिक, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश ओबीसी मोर्चाच्या उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुखपदी स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गिते यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सूचनेनुसार, प्रदेश सरचिटणीस व ओबीसी मोर्चा प्रदेश प्रभारी आ. योगेश सागर तसेच ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष आ. योगेश टिळेकर यांनी भाजप प्रदेश ओबीसी मोर्चाची नूतन प्रदेश कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली.
गणेश गिते यांनी माजी स्थायी समिती सभापती म्हणून नाशिक महानगरपालिकेत सांभाळलेला यशस्वी कारभार, संघटनात्मक कामाचा अनुभव आणि पक्षाप्रती असलेली निष्ठा लक्षात घेऊन पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर ही नवीन जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या या नियुक्तीमुळे उत्तर महाराष्ट्रातील (नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार) भाजप ओबीसी मोर्चाचे संघटन अधिक मजबूत होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दरम्यान, गिते यांच्या नियुक्तीनंतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. गिते यांचे विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी अभिनंदन केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI