
जळगाव, 21 ऑगस्ट (हिं.स.) गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने नागपूर ते मडगाव दरम्यान विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष गाडीच्या एकूण ६ फेऱ्या होणार असून, भुसावळ स्थानकावर थांबा देण्यात आल्याने खान्देशातील गणेशभक्त आणि प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
रेल्वे प्रशासनाच्या माहितीनुसार, गाडी क्रमांक ०११३९ नागपूर-मडगाव विशेष ट्रेन दर बुधवारी रात्री ११.४५ वाजता नागपूरहून रवाना होईल. तर परतीच्या प्रवासासाठी गाडी क्रमांक ०११४० मडगाव-नागपूर विशेष दर मंगळवारी सायंकाळी ७ वाजता मडगावहून सुटणार आहे.या विशेष गाडीला एकूण १९ डबे असतील. यामध्ये वातानुकूलित तृतीय श्रेणी (एसी-३), शयनयान (स्लीपर) तसेच सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे उपलब्ध असणार आहेत.
नागपूर-मडगाव विशेष ट्रेनला वर्धा, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिक रोड, कल्याण, पनवेल, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली आणि सावंतवाडी या प्रमुख स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव, भुसावळसह खान्देशातील प्रवाशांना कोकणात जाण्यासाठी अतिरिक्त रेल्वे सुविधा उपलब्ध झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर