
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)।
लातूर जिल्ह्यात शेतशिवार व घरासमोरून शेळ्या चोरी करून त्यांची विक्री करणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून ११ लाख ७५ हजार रुपयांची रोकड, छोटा टेम्पो आणि मोटारसायकल असा एकूण १७ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींच्या चौकशीत जिल्ह्यातील तब्बल २१ शेळी चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अंमलदार मालमत्तेविषयक गुन्ह्यांतील आरोपींची माहिती घेत असताना चाकूर परिसरात चोरीच्या शेळ्यांच्या विक्रीतून मिळालेल्या पैशांची वाटणी करण्यासाठी टोळीतील सदस्य येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार शिरूर ताजबंद ते चाकूर रोडवरील चापोली येथील पांडुरंग हॉटेलसमोर पोलिसांनी सापळा रचला.
यावेळी छोट्या टेम्पो व मोटारसायकलसह संशयितरित्या थांबलेल्या कैलास राम वळींग्रे (२५, रा. शिरूर ताजबंद, ता. अहमदपूर) आणि बालाजी खंडु माने (५४, रा. वडर गल्ली, देवणी) यांना ताब्यात घेण्यात आले. पंचांसमक्ष झडती घेतली असता टेम्पोमध्ये ११ लाख ७५ हजार रुपयांची रोकड आढळून आली.
पोलिसांनी विश्वासात घेऊन चौकशी केली असता आरोपींनी अमोल गिरधारी गुंजरगे आणि आत्माराम उर्फ पप्पू माधवराव जाधव यांच्या साथीने जिल्ह्यातील विविध गावांच्या शिवारातून तसेच घरासमोरून शेळ्या चोरी केल्याची माहिती दिली. चोरी केलेल्या शेळ्यांची विक्री करून मिळालेली रक्कम असल्याचेही त्यांनी सांगितले.
पोलिस अभिलेखाच्या पडताळणीत अहमदपूर-३, चाकूर-४, औसा-१, लातूर ग्रामीण-२, वाढवणा-३, रेणापूर-१, देवणी-२, निलंगा-१, किनगाव-२ आणि भादा-२, असे एकूण २१ गुन्हे निष्पन्न झाले आहेत.
जप्त मुद्देमालामध्ये ११ लाख ७५ हजार रुपये रोख, अशोक लेलँड कंपनीचा छोटा टेम्पो (५ लाख रुपये) आणि बजाज पल्सर मोटारसायकल (१ लाख रुपये) यांचा समावेश आहे.
फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
शेतकरी, पशुपालकांनी दक्ष राहावे
शेतकरी व पशुपालकांनी रात्रीच्या वेळी शेळ्या, मेंढ्या आणि इतर पशुधनाच्या सुरक्षेबाबत विशेष दक्षता घ्यावी. पशुधन चोरीस गेल्यास विलंब न करता जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis