
१३ प्रमुख आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीवर कार्यशाळेत भर
कोल्हापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. निपुण विनायक यांनी 21 ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्याचा दौरा करून जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. या दौऱ्यात त्यांनी विविध आरोग्य संस्थांना प्रत्यक्ष भेटी देऊन आरोग्य सेवांची पाहणी केली.
सकाळच्या सत्रात डॉ. निपुण विनायक यांनी आरोग्य उपकेंद्र, कुर, प्राथमिक आरोग्य केंद्र, मडीलगे आणि ग्रामीण रुग्णालय, गारगोटी येथे भेट दिली. यावेळी त्यांनी उपलब्ध आरोग्य सेवा, साधनसामग्री, मनुष्यबळ, औषधसाठा, नोंदवही तसेच रुग्णसेवेची प्रत्यक्ष पाहणी केली.
उपलब्ध संसाधनांचा प्रभावी वापर करण्यासोबतच आरोग्य सेवांच्या गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. नागरिकांना वेळेत, सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
१३ प्रमुख आरोग्य सेवांच्या अंमलबजावणीचा आढावा
दुपारच्या सत्रात कळंबा येथील अमृतसिद्धी हॉलमध्ये जिल्हास्तरीय विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत शासकीय आरोग्य संस्थांमार्फत नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या १३ प्रमुख आरोग्य सेवांच्या प्रभावी अंमलबजावणीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
कार्यशाळेत आरोग्य सेवांची सद्यस्थिती, उपलब्ध मनुष्यबळ व साधनसामग्री, सेवांची गुणवत्ता तसेच नागरिकांना सेवा देताना येणाऱ्या अडचणी याबाबत चर्चा करण्यात आली. आरोग्य यंत्रणेने उपलब्ध साधनसंपत्तीचा अधिक परिणामकारक वापर करून नागरिककेंद्रित आरोग्य सेवा देण्यावर भर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
अधिकारी, वैद्यकीय कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांची उपस्थिती
या कार्यशाळेस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन आणि मनपा आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची विशेष उपस्थिती होती.
जिल्हास्तरीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयांचे अधीक्षक, जिल्हा व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका तसेच विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांचे समन्वयक कार्यशाळेस उपस्थित होते.
जिल्ह्यातील शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करून नागरिकांना प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रधान सचिवांच्या या दौऱ्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar