शेतकऱ्यांच्या शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी इंद्रजीत पवार मैदानात
उजनी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध अडचणी आणि गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी प्रशासकीय पातळीवर पाठ
Indrajeet pawar


उजनी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट

सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणीपुरवठ्याशी संबंधित विविध अडचणी आणि गंभीर प्रश्न तातडीने मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांनी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा सुरू केला आहे. तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेवटच्या बांधापर्यंत हक्काचे पाणी पोहोचावे, यासाठी त्यांनी आज उजनी कालवा विभाग क्रमांक ८, सोलापूरचे कार्यकारी अभियंता म्याकल यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.

या बैठकीत इंद्रजीत पवार यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गावागावांमधील पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, उजनी कालव्यांमधून शेतीसाठी मिळणारे पाणी तसेच शेतकरी आणि नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध पाणी समस्यांकडे कार्यकारी अभियंत्यांचे लक्ष वेधले.

पाणीटंचाई तसेच पाणी नियोजनातील अडचणींमुळे नागरिकांना होणारा त्रास कमी करण्यासाठी संबंधित प्रश्न तातडीने सोडवावेत आणि नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पवार यांनी केली. यावेळी कार्यकारी अभियंता म्याकल यांनी मांडण्यात आलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत, संबंधित अडचणींवर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

शेवटच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याचा निर्धार

“शेतकऱ्यांच्या शेवटच्या बांधावर पाणी पोहोचले पाहिजे,” या भूमिकेतून इंद्रजीत पवार सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. उत्तर सोलापूर तालुक्याच्या विकासासाठी आपल्या पदाचा प्रभावी वापर करताना केवळ आश्वासनांवर न थांबता थेट संबंधित शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन प्रश्न मांडण्यावर त्यांचा भर आहे.

उजनी कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांसोबत झालेली आजची भेट ही त्याच धडक कार्यपद्धतीचा भाग मानली जात असून, या माध्यमातून उत्तर सोलापूरमधील पाणीपुरवठा आणि सिंचनाशी संबंधित प्रश्नांना गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande