आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला मिळाली मूल्यवर्धनाची जोड
विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून बोधडी बु. येथील शेवगा लागवड व प्रक्रिया युनिटची पाहणी नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या किनवट तालुका पाहणी दौऱ्यादरम्यान बोधडी बु. (पिंपरफोडी शिवार) येथील वनश्
अ


विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीकडून बोधडी बु. येथील शेवगा लागवड व प्रक्रिया युनिटची पाहणी

नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र विधानमंडळ अनुसूचित जमाती कल्याण समितीच्या किनवट तालुका पाहणी दौऱ्यादरम्यान बोधडी बु. (पिंपरफोडी शिवार) येथील वनश्री आदिवासी शेतकरी उत्पादक गटाच्या शेवगा लागवड व प्रक्रिया युनिटची पाहणी करण्यात आली. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प (ITDP), कृषी विभाग आणि HIMWP-BRLF प्रकल्पाच्या सहकार्याने हे युनिट उभारण्यात आले आहे.

समिती प्रमुख तथा विधानसभा सदस्य शांताराम मोरे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पाहणीवेळी विधानपरिषद सदस्य उमा खापरे, विधानसभा सदस्य मंजुळा गावित, हिरामण खोसकर, राजू तोडसाम, इद्रिस नायकवडी, राजेश पाडवी, रामदास मसराम आणि हरिशचंद्र भोये यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी समिती सदस्यांनी शेवगा लागवड प्लॉटची प्रत्यक्ष पाहणी केली. शेवगा लागवड, उत्पादन, काढणी आणि त्यानंतरच्या प्रक्रियेबाबत वनश्री गटाच्या पदाधिकाऱ्यांनी माहिती दिली. त्यानंतर प्रक्रिया युनिटमधील विविध यंत्रसामग्रीची पाहणी करण्यात आली.

शेवग्याच्या पानांपासून पावडर निर्मिती, प्रक्रिया, पॅकेजिंग, मूल्यवर्धन आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी याबाबत समिती सदस्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. शेतीमालावर स्थानिक पातळीवर प्रक्रिया करून त्याचे मूल्य वाढविण्याच्या या उपक्रमाचे समिती सदस्यांनी अवलोकन केले.

या प्रकल्पाच्या माध्यमातून आदिवासी शेतकऱ्यांच्या शेवगा उत्पादनाला स्थानिक पातळीवर प्रक्रिया व मूल्यवर्धनाची जोड मिळत आहे. त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविणे, स्थानिक रोजगारनिर्मिती करणे तसेच शेतमालाला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून देणे हा प्रमुख उद्देश आहे.

ITDP, कृषी विभाग आणि High Impact Mega Watershed Project-BRLF यांच्या समन्वयातून उभारलेला हा प्रकल्प आदिवासी शेतकऱ्यांसाठी शेतीपासून प्रक्रिया आणि बाजारपेठेपर्यंतची संपूर्ण मूल्यसाखळी निर्माण करण्याचे उल्लेखनीय उदाहरण ठरत आहे.

पाहणीदरम्यान नांदेडचे जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी डॉ. बी. सरवनन, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तकुमार कळसाईत, किनवट तहसीलदार शारदा चौंडेकर, तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत निमोड, सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रदीप नाईक, गट विकास अधिकारी जयश्री वाघमारे तसेच BRLF प्रादेशिक समन्वयक दिनेश खडसे, APO चेतन जाधव, प्रसाद डुबुकवाड, अंकुश शिंदे, HIMWP टीम आणि वनश्री गटाचे सदस्य उपस्थित होते.

----------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande