
नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी शासन निर्देशानुसार केंद्रातील आवश्यक सुविधांची पूर्तता करून 22 ऑगस्ट 2026 पर्यंत Self Survey करणे अनिवार्य करण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाच्या 23 जून 2026 रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच मुख्यमंत्री कार्यालयाच्या निर्देशान्वये ही कार्यवाही करण्यात येत आहे.
जिल्ह्यातील सर्व आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी त्यांच्या केंद्रामध्ये शासनाने निर्धारित केलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे, आवश्यक बॅनर लावणे तसेच नागरिकांसाठी निर्धारित दरपत्रक प्रदर्शित करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
GIS Mapping आणि Geo-Fencing
प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्राचे GIS Mapping आणि 50 मीटर Geo-Fencing करण्यात येणार आहे. मंजूर करण्यात आलेल्या Geo-Fencing क्षेत्रातूनच संबंधित केंद्र चालकांना लॉगिन करता येणार आहे. त्यामुळे केंद्र चालकांनी शासनाने निर्धारित केलेल्या सर्व बाबींची पूर्तता करणे आवश्यक आहे.
जिल्ह्यातील काही आपले सरकार सेवा केंद्र चालकांनी अद्याप आवश्यक बाबींची पूर्तता केलेली नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा केंद्र चालकांना अंतिम संधी देण्यात आली असून, त्यांनी 22 ऑगस्ट 2026 पर्यंत सर्व आवश्यक बाबी पूर्ण करून Self Survey करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी केले आहे.
जिल्ह्यात 2,025 आपले सरकार सेवा केंद्रे
नांदेड जिल्ह्यात एकूण 2 हजार 25 आपले सरकार सेवा केंद्रे कार्यरत आहेत. त्यापैकी नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित 676, जिल्हा परिषदेच्या अखत्यारित 1 हजार 333, तर महानगरपालिका, नगरपालिका व नगरपंचायतींच्या अखत्यारित 16 केंद्रांचा समावेश आहे.
शासनाने निर्धारित केलेल्या सर्व बाबींची पूर्तता न करणाऱ्या केंद्र चालकांचे केंद्र बंद करण्यात येईल, याची सर्व संबंधित केंद्र चालकांनी नोंद घ्यावी, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव, सेतू समिती, नांदेड यांनी केले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis