
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणातून विषबाधा झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत एका आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची माहिती असून, अन्य सात विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेमुळे शाळेच्या व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या जेवणाच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत असून, निकृष्ट दर्जाच्या अन्नामुळे विषबाधा झाल्याचा आरोप केला जात आहे. विद्यार्थ्यांना वेळेत योग्य वैद्यकीय उपचार मिळाले नसते, तर परिस्थिती आणखी गंभीर झाली असती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली जात आहे.
या घटनेची गंभीर दखल घेत भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी यांनी शाळा व्यवस्थापनावर तीव्र टीका केली आहे. शाळेच्या भोंगळ कारभारामुळेच निष्पाप विद्यार्थ्यांवर हा प्रसंग ओढवला असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘आदिवासी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ’
आदिवासी विद्यार्थ्यांच्या नावावर अनुदान लाटून त्यांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा आरोप कुलकर्णी यांनी केला. हा प्रकार शालेय भ्रष्टाचाराचा बोलका नमुना असल्याचेही त्यांनी म्हटले.
या संपूर्ण घटनेची कसून चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. दोषींवर कारवाई झाली नाही, तर भविष्यातही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, घटनेमागील नेमके कारण, विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या अन्नाचा दर्जा आणि शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी याबाबत संबंधित यंत्रणांकडून सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे बोलले जात आहे.
-----------------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी