
अमरावती, २१ ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या महर्षी पब्लिक स्कूलमधील दोन विद्यार्थ्यांच्या रजा नोंदीत मोठी तफावत आढळून आली आहे. विद्यार्थी प्रत्यक्षात १६ ऑगस्टला पालकांसोबत गेले असताना रजिस्टरमध्ये १४ ऑगस्टची नोंद करण्यात आल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले आहे. या प्रकरणाची आदिवासी विकास विभागाकडून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
महर्षी पब्लिक स्कूलच्या नामांकित आश्रमशाळेत चिखलदरा तालुक्यातील दोन विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या पालकांनी त्यांना १६ ऑगस्ट रोजी शाळेतून घेऊन गेल्याची माहिती सुरुवातीला समोर आली होती. मात्र, शाळेच्या रजिस्टरमध्ये त्यांची रजा १४ ऑगस्ट रोजीच नोंदविण्यात आल्याचे चौकशीत दिसून आले.
विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्याला घेण्यासाठी शाळेत आलेल्या त्याच्या भावाचे अधिकाऱ्यांनी बयाण नोंदविले. त्याने आपल्या भावाला १६ ऑगस्टला शाळेतून घेऊन गेल्याचे सांगितले आहे. त्यामुळे प्रत्यक्ष घटना १६ ऑगस्टला घडली असताना रजिस्टरमध्ये १४ ऑगस्टची नोंद कशी करण्यात आली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
“चौकशीदरम्यान अशा प्रकारची अनियमितता आढळून आली आहे,” अशी माहिती आदिवासी विकास विभागाचे अपर आयुक्त संदीप गोलाईत यांनी दिली.
परवानगी नसल्याने मेस सील
दरम्यान, महर्षी पब्लिक स्कूलच्या वसतिगृहातील मेस सुरू करण्यासाठी शाळा प्रशासनाने अन्न व औषध प्रशासनाची आवश्यक परवानगी घेतली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने तपासणी करून मेस सील केली आहे.
अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त विनय चव्हाण यांनी मेसला परवानगी नसल्याची माहिती दिली. मेस सील झाल्यामुळे शाळा प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या भोजनासाठी काही दिवस पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.
विद्यार्थ्याच्या प्रकृतीबाबतही प्रश्न
रजा घेऊन गावी गेलेल्या एका विद्यार्थ्याची १५ ऑगस्ट रोजी प्रकृती बिघडली होती. त्याला उलट्या झाल्याचे काही विद्यार्थ्यांनी अधिकाऱ्यांना दिलेल्या बयाणात सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्याची प्रकृती बिघडल्याची माहिती मिळाल्यानंतरही शाळा प्रशासनाने त्याची चौकशी का केली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महर्षी पब्लिक स्कूल या आश्रमशाळेच्या परिसरात सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यापैकी अनेक कॅमेरे कार्यरत असल्याचे दिसून आले; मात्र त्यांच्या फुटेजचे नियमित स्टोरेज होत नसल्याचे चौकशीत निदर्शनास आले आहे.
त्यामुळे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी त्यांचे पालक किंवा नातेवाईक १४ ऑगस्टला आले होते की १६ ऑगस्टला, हे सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निश्चित करणे शक्य झालेले नाही.
शाळा प्रशासनाला नोटीस
या संपूर्ण घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर महर्षी पब्लिक स्कूलच्या शाळा प्रशासनाला तातडीने आपले म्हणणे सादर करण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. २१ ऑगस्टपर्यंत आपले मत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“घटनाक्रमानंतर शाळा प्रशासनाने तातडीने आपले मत सादर करावे, असे नोटीस बजावून सांगण्यात आले आहे. शुक्रवार, २१ ऑगस्टपर्यंत त्यांचे मत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत,” अशी माहिती संदीप गोलाईत, अपर आयुक्त, आदिवासी विकास विभाग, अमरावती यांनी दिली.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी