
लातूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर सायकलिस्ट क्लबच्या सदस्यांनी लातूर ते राजस्थानमधील खाटू श्याम असा तब्बल १३६० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ६.५ दिवसांत सायकलवरून पूर्ण करून उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या साहसी आणि प्रेरणादायी मोहिमेतून त्यांनी शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक कणखरता आणि जिद्दीचे दर्शन घडविले.
या सायकल यात्रेचा उद्देश केवळ प्रदीर्घ अंतर पार करणे हा नव्हता, तर ‘पर्यावरण संवर्धन’, ‘पाणी वाचवा’ आणि ‘माती वाचवा’ या महत्त्वपूर्ण विषयांबाबत जनजागृती करणे हाही होता. सायकलच्या माध्यमातून पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला.
लातूरपासून सुरू झालेली ही प्रदीर्घ सायकल मोहीम राजस्थानातील खाटू श्याम येथे यशस्वीरीत्या पूर्ण झाली. तब्बल १३६० किलोमीटरचे अंतर साडेसहा दिवसांत पार करणे ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आहे.
या उपक्रमामुळे आरोग्य, सायकलिंग आणि पर्यावरण संवर्धन याबाबत समाजात सकारात्मक संदेश पोहोचण्यास मदत झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis