
बीड, 21 ऑगस्ट (हिं.स.)।
गेवराई विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार विजयसिंह पंडित यांच्या हस्ते मौजे भेंडटाकळी येथे १४ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा शुभारंभ करण्यात आला.
गेवराई विधानसभा मतदारसंघात शाश्वत विकासाची कामे सुरू होत आहेत. राज्याच्या सक्षम उपमुख्यमंत्री ना. श्रीमती सुनेत्रावहिनी अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली आ. विजयसिंह पंडित मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे प्रयत्नशील आहेत.
रा.मा. ६१ जातेगाव फाटा ते वाहेगाव या रस्त्याचे रुंदीकरणासह सुधारणा करणे, जातेगाव फाटा ते भेंडटाकळी रस्त्यावर पुलाचे बांधकाम करणे, मौजे भेंडटाकळी येथे नवीन पशुवैद्यकीय दवाखाना इमारतीचे बांधकाम करणे आणि मौजे भेंडटाकळी येथील हनुमान मंदिरासमोर सामाजिक सभागृहाचे बांधकाम करणे, अशा सुमारे १४ कोटी ७५ लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचा यामध्ये समावेश आहे.
मौजे वाहेगावकडे जाणाऱ्या रस्त्याचे रुंदीकरण करून या रस्त्यावरील चढ कमी करण्यात येणार असल्याने भविष्यात मोठ्या व जड वाहनांची वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. पावसाळ्यात सातत्याने पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होणाऱ्या ठिकाणी पुलाची उंची वाढवून तीन गाळ्यांचा मोठा पूल बांधण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या दुतर्फा वृक्षलागवड करून तीन वर्षे या वृक्षांची जोपासना संबंधित कंत्राटदाराकडून करण्यात येणार आहे.
रस्ते विकासासोबतच सिंचनाच्या सुविधा वाढविण्यावरही जाणीवपूर्वक भर दिला जात आहे. गोदावरी नदीप्रमाणे सिंदफणा नदीवरही बॅरेजची साखळी निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या भागातील दुष्काळाचे कायमस्वरूपी निर्मूलन करण्याच्या दृष्टीने नियोजनबद्ध प्रयत्न केले जात आहेत.
दळणवळण, आरोग्य, शिक्षण आणि सिंचन या क्षेत्रांतील सर्वंकष विकासकामांना संपूर्ण मतदारसंघात गती देण्यात येत असून, मतदारसंघातील प्रत्येक भाग विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा आ. विजयसिंह पंडित यांचा निर्धार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis