
सोलापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.)। जलसंधारण दिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यात दि. 15 ते 21 ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप म्हणून आज सकाळी होम मैदान येथे ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’ चे आयोजन करण्यात आले. या पदयात्रेसाठी तब्बल 5 हजार 115 नागरिकांनी नोंदणी केली होती.
हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी सर्व उपस्थितांनी जलसंधारणाची सामूहिक शपथ घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून महावॉकेथॉनला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन म्हणाले, जलसंधारण सप्ताहाच्या निमित्ताने सुरक्षित भविष्यासाठी पाणी आणि मातीचे संवर्धन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पावसाचे पाणी अडवणे, पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि पाण्याचे प्रदूषण कमी करणे अत्यावश्यक आहे. जमिनीची धूप व माती वाहून जाणे रोखण्यासाठी शेतांमध्ये तसेच डोंगर उतारांवर बांधबंधिस्ती करावी. जमिनीची धूप कमी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. आपण ज्या पद्धतीने आपल्या आरोग्याची काळजी घेतो, त्याचप्रमाणे पर्यावरणाचे आरोग्यही जपले पाहिजे. त्यातूनच आपले पुढील भविष्य सुरक्षित राहील.
‘एक पाऊल पुढे’ या संदेशासह नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग
‘माती आणि पाण्याच्या संवर्धनासाठी एक पाऊल पुढे टाकूया. आजची बचत उद्याचे सुरक्षित भविष्य!’ हा संदेश देत नागरिकांनी या महावॉकेथॉनमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड