
कोल्हापूर, 21 ऑगस्ट (हिं.स.) : मृदा संधारण आणि जलसंधारण हे शेती, पर्यावरण तसेच शाश्वत विकासाचा पाया असून भविष्यातील पिढ्यांसाठी माती व पाण्याचे संवर्धन करणे आवश्यक आहे. याबाबत जनजागृती करण्यासाठी आणि युवा पिढीमध्ये जलसंधारणाचे महत्त्व रुजवण्यासाठी राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये 21 ऑगस्ट रोजी जलसंधारण दिनानिमित्त ‘महावॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले.
कोल्हापुरात वारणा भवन येथून महावॉकेथॉन रॅलीला सुरुवात झाली. ‘पाणी आडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ आणि ‘पाणी वाचवूया, भविष्य घडवूया’ असा संदेश देत जिल्हा प्रशासनातील अधिकारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले.
जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मृदा व जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता स्वप्नील पवार, उपकार्यकारी अभियंता संतोष पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी ‘पाणी वाचवा, देश घडवा, समृद्ध महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देण्यासाठी महावॉकेथॉनचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले. “पडणाऱ्या प्रत्येक पाण्याचा थेंब अडवला गेला पाहिजे आणि अडवलेला प्रत्येक थेंब जमिनीत जिरवला गेला पाहिजे. आपली धरणे गाळमुक्त आणि शिवारे गाळयुक्त झाली पाहिजेत,” असे आवाहन त्यांनी केले. जलसंधारण अभियानात समाजातील सर्व घटकांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले.
माती आणि पाणी ही निसर्गाची अमूल्य संपत्ती असून त्यांच्या संवर्धनासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची शपथ यावेळी उपस्थितांनी घेतली.
महावॉकेथॉनमध्ये समीर दगडू पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तुकाराम कृष्णात मोरे यांनी द्वितीय, तर करण रमेश गवळी यांनी तृतीय क्रमांक मिळवला. शिवराय नामदेव कात्रे चौथे, मयूर कृष्णात अडसूळ पाचवे, प्रतीक सुभाष कांबळे सहावे, संजय शामराव जाधव सातवे, दिलीप मोहनराव कुमठेकर आठवे, अनिल बनाबाई पांडुरंग कांबळे नववे आणि मनीषा मोहन गराडे दहाव्या क्रमांकावर आले. विजेत्यांना सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. महिलांमध्ये प्रियांका सुनील जाधव, संयुक्त आनंद गायकवाड आणि डॉ. आशा रेघे यांना विशेष प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देण्यात आले.
डॉ. बापूजी साळुंखे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, विवेकानंद महाविद्यालय, डॉ. डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय, महावीर महाविद्यालय, इतर मागास बहुजन कल्याण मुलांचे शासकीय वसतिगृह, शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय आणि द न्यू कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक तसेच जलसंधारण विभागातील अधिकारी-कर्मचारी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
---------------------
हिंदुस्थान समाचार / VijayKumar Pandurang Powar