मनोज बाजपेयी साकारणार महात्मा गांधींची भूमिका
मुंबई, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी लवकरच दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात ''राष्ट्रपिता'' महात्मा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्
Manoj


मुंबई, 21 ऑगस्ट, (हिं.स.)।

राष्ट्रीय पुरस्कार विजेते अभिनेते मनोज बाजपेयी लवकरच दिग्दर्शक सुधीर मिश्रा यांच्या आगामी चित्रपटात 'राष्ट्रपिता' महात्मा गांधींची भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वपूर्ण पण फारसा ज्ञात नसलेला अध्याय मोठ्या पडद्यावर आणणार आहे. मनोज बाजपेयींच्या या नवीन रूपाबद्दल प्रेक्षक आणि चित्रपटप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.

या चित्रपटाची निर्मिती अनुभव सिन्हा यांची निर्मिती संस्था 'बनारस मीडियावर्क्स' करत असून, एनएच स्टुडिओचे (NH Studios) नरेंद्र हिरावत याचे निर्माते आणि प्रस्तुतकर्ता आहेत. ज्येष्ठ अभिनेते सौरभ शुक्ला देखील या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. राजकीय आणि सामाजिक विषयांवर आधारित चित्रपटांसाठी सुधीर मिश्रा ओळखले जातात आणि हा प्रकल्प त्यांच्या सर्वात महत्त्वाकांक्षी उपक्रमांपैकी एक मानला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा चित्रपट १९४७ मधील त्या २१ दिवसांच्या कथेवर आधारित असेल, जेव्हा देश स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर उभा होता, तरीही महात्मा गांधी सत्तेच्या वर्तुळापासून आणि उत्सवापासून दूर राहिले होते. दिल्लीतील राजकीय घडामोडींपेक्षा आपल्या तत्त्वांना आणि आदर्शांना प्राधान्य देणाऱ्या गांधींच्या आयुष्यातील त्या टप्प्यावर हा चित्रपट एक नवा दृष्टिकोन मांडेल. सुधीर मिश्रा यांच्या मते, ही कथा गांधींचे व्यक्तिमत्त्व आणि त्यांचे ऐतिहासिक निर्णय यांच्या खोलात जाण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, मनोज बाजपेयींनी 'सत्या', 'शूल', 'पिंजर', 'अलीगढ' आणि 'द फॅमिली मॅन' यांसारख्या गाजलेल्या कलाकृतींमधून आपली अभिनयाची चुणूक यापूर्वीच सिद्ध केली आहे. आता, 'भिकू म्हात्रे' या पात्रापासून 'बापू' यांच्या भूमिकेपर्यंतचा त्यांचा हा प्रवास प्रेक्षकांसाठी एक नाविन्यपूर्ण आणि अविस्मरणीय अनुभव ठरेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande