
मुंबई, 21 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या वतीने मराठी-गुजराती साहित्यिक व सांस्कृतिक आदान-प्रदानाला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर (कुसुमाग्रज) लिखित अजरामर मराठी नाटक ‘नटसम्राट’चे गुजराती भाषेतील नाट्यरूपांतर प्रथमच रंगभूमीवर सादर करण्यात येणार आहे.
या गुजराती अनुवादित नाटकाचा पहिला प्रयोग शनिवार, 22 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता लघु नाट्यगृह, रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे होणार आहे. हा पहिला प्रयोग केवळ निमंत्रितांसाठी आयोजित करण्यात आला आहे.
या विशेष उद्घाटन समारंभास सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड आशिष शेलार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असून, सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी तसेच पॉप्युलर प्रकाशनचे व्यवस्थापकीय संचालक रामदास भटकळ यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. मान्यवरांच्या हस्ते या नाट्यप्रयोगाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
‘नटसम्राट’ हे मराठी रंगभूमीवरील अत्यंत लोकप्रिय आणि प्रभावी नाटक असून, कलाकाराच्या आयुष्यातील संघर्ष, मानवी नातेसंबंध, यश-अपयश आणि भावभावनांचे प्रभावी चित्रण या नाटकातून करण्यात आले आहे. कुसुमाग्रज लिखित हे नाटक मराठी साहित्य आणि रंगभूमीचा अमूल्य ठेवा मानले जाते.
१९७० मध्ये प्रकाशित झाल्यानंतर ‘नटसम्राट’ने मराठी रंगभूमीवर मैलाचा दगड निर्माण केला. गेल्या पाच दशकांहून अधिक काळात या नाटकाचे हजारो प्रयोग झाले असून, अनेक पिढ्यांतील रसिकांनी या कलाकृतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. डॉ. श्रीराम लागू, दत्ता भट, चंद्रकांत गोखले, मोहन जोशी आणि विक्रम गोखले यांसारख्या दिग्गज कलाकारांनी गणपतराव बेलवलकर ही भूमिका साकारून नाटकाच्या लोकप्रियतेत मोलाची भर घातली.
मराठी साहित्याची समृद्ध परंपरा आणि त्यातील मानवी मूल्ये गुजराती भाषिक वाचक आणि रसिकांपर्यंत पोहोचविणे, तसेच दोन्ही भाषांमधील साहित्यिक व सांस्कृतिक संवाद अधिक दृढ करणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. साहित्य, भाषांतर, परिसंवाद, नाट्यप्रयोग, चर्चासत्रे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध भाषा व संस्कृतींना जोडण्याचे कार्य महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या माध्यमातून केले जात आहे.
या पहिल्या प्रयोगानंतर राज्यात आणखी ९ प्रयोग सादर करण्यात येणार आहेत. त्यामुळे मराठी रंगभूमीवरील या अभिजात कलाकृतीचे गुजराती भाषेतील रूपांतर अधिक व्यापक प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून, मराठी-गुजराती साहित्यिक आणि सांस्कृतिक आदान-प्रदानाला नवी दिशा मिळणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर