सारेगमपच्या मंचावर अवधूत गुप्तेंचं पुनरागमन
मुंबई, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर
गुप्ते


मुंबई, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी संगीतविश्वातील लोकप्रिय गायक, संगीतकार आणि परीक्षक अवधूत गुप्ते पुन्हा एकदा ‘सारेगमप’च्या मंचावर परीक्षकाच्या भूमिकेत परतले आहेत. अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलेल्या ‘सारेगमप’च्या या नव्या पर्वात नव्या पिढीचे नवे आवाज, त्यांची संगीताकडे पाहण्याची बदललेली दृष्टी आणि सोशल मीडियामुळे बदललेलं संगीतविश्व पाहायला मिळणार आहे. यानिमित्ताने त्यांनी नव्या पिढीचं संगीत, सोशल मीडियाचा प्रभाव, स्पर्धकांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संगीतप्रवासाबद्दल मनमोकळेपणाने संवाद साधला.

‘सारेगमप’मध्ये खूप काही नवीन आणि खास पाहायला मिळणार आहे. नवीन टॅलेंट, नवीन चेहरे, नवीन आवाज आणि नावीन्य असलेली नवी पिढीच पाहायला मिळेल, असं म्हणायला हरकत नाही. आताची पिढी खूप स्मार्ट आहे. त्यांचं जीवनमान त्यांच्या पद्धतीने बदललं आहे. ही पिढी खूप फास्ट आहे. नव्या पिढीचं संगीत आत्मसात करण्याचं माध्यम, संगीत उपभोगण्याचं माध्यमही बदललं आहे. आता सोशल मीडिया आणि इतर माध्यमांमधून नव्या पिढीला गाणी मिळत असतात आणि ती त्यांना आकर्षित करत असतात. अशा पिढीचं गाणं आपण यावेळेस ‘सारेगमप’ मध्ये ऐकणार आहोत. त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि हेच या सीझनचं सगळ्यात मोठं नावीन्य असेल, असं मला वाटतं.

अनेक नवोदित गायकांचा प्रवास जवळून पाहिला आहे असून अवधूत यांनी आजच्या स्पर्धकांमध्ये कोणते वेगळेपणा जाणवत हे सांगितले अनेक वर्षांचा अनुभव असला तरी माझ्यासाठी गाणं म्हणजे संगीताचे जे सात सूर आणि ताल आहेत, जे कधीच बदलत नाहीत. मात्र त्यामागचा भाव बदलत असतो. हा बदलणारा भाव सध्याच्या समाजाचं प्रतिबिंब दाखवत असतो. आजची जी पिढी आहे ती आधीच्या पिढीपेक्षा खूप वेगळी आहे एकदम स्पष्ट मतांची, स्पष्टवक्ती . ज्याला नमस्कार करावासा वाटतो, त्यालाच ही पिढी नमस्कार करते. हल्लीची पिढी खूप विचार करते. समोरच्या माणसाच्या पात्रतेप्रमाणे वागते. ‘सारेगमप’ची संपूर्ण टीम शिक्षणापेक्षा संस्कार देण्याचा जास्त प्रयत्न करत असते. म्हणायचं झालं तर सगळंच आज इंटरनेटवर अगदी सहज उपलब्ध आहे. गाण्यातील राग म्हणा, यमन म्हणा, त्यासाठी आता ऑनलाइन बरीच माहिती उपलब्ध आहे. फुकट नऊ-दहा लोक तुम्हाला एका युट्युब सर्चच्या माध्यमातून शिकवताना दिसतात. पण परीक्षक म्हणून आमचं काम नुसतं गाण्याचं शिक्षण देणं नाही, तर त्याचे संस्कार स्पर्धकाला देणं हे आहे. मी ठामपणे म्हणेन, नुसतं शिक्षणापेक्षा संस्कार देणं हे कायम ‘सारेगमप’ने केलं आहे. हे संस्कार सध्याच्या सोशल मीडियाच्या जमान्यात तर फार महत्त्वाचे झाले आहे. कारण आज सोशल मीडियाचा वापर करून एखाद्या चांगल्या गायकाने एखादी चांगली कलाकृती करून सोशल मीडियावर टाकली, तर त्याला किती लाईक्स आले आहेत यावर तो स्वतःची पात्रता ठरवतो, जे अत्यंत चुकीचं मत आहे. कदाचित तो सर्वोत्कृष्ट गायक असेल आणि त्याला प्रोत्साहनाची गरज असेल. पण सोशल मीडियाच्या कमर्शियल गोष्टींमुळे त्याचा टिकाव जरी लागत असेल, तरी त्याला थांबवून सांगणं महत्त्वाचं आहे की सोशल मीडिया हा निकष नाही. या उलट जो एखादा गायक वेगवेगळे गिमिक्स करून सोशल मीडियावर प्रसिद्ध होतोय, त्याला जास्त लाईक्स मिळत आहेत. पण तो चांगला गायक नसेल, तर अशा गायकाचे मार्क इथे, ‘सारेगमप’च्या मंचावर आरसा दाखवल्यासारखे कमी होणार. त्याच्या गायनात जे सोनं आहे, ते त्याला आपल्या सगळ्यांसमोर चमकवून दाखवावं लागणार. हा मोठा फरक आहे सोशल मीडिया आणि ‘सारेगमप’च्या मंचामध्ये.

परीक्षक म्हणून माझा निकष कधीच बदलणार नाही. पहिलं म्हणजे सूर आणि ताल, दुसरं म्हणजे काव्याची जाण, शब्दांचा अर्थ समजून घेतला आहे की नाही याची परीक्षा आणि त्यामुळे येणारी भावुकता. या चार गोष्टी सगळ्यात जास्त महत्त्वाच्या आहेत. गाणं गातानाच गायकाचं प्रेझेंटेशनही खूप महत्त्वाचं असतं. कारण गाणं प्रस्तुत करताना ते समोरच्याला पण समजावून सांगता आलं पाहिजे. त्याचे भाव हे समोरच्यालाही फील झाले पाहिजेत आणि हे सर्वाधिक महत्त्वाचं आहे. आम्ही परीक्षक म्हणून जुन्या आणि नव्याचा एक मिलाप करण्याचा प्रयत्न करत आहोत. स्पर्धकांचं खरं संगीत, खरं टॅलेंट हे प्रेक्षकांसमोर आणणं, जे खरोखर टॅलेंटेड आहेत त्यांना प्रोत्साहन देणं हे जरी परीक्षकांचं काम असलं, तरी नव्या माध्यमांसमोर जायला आजच्या पिढीला तयार करणं ही देखील एका परीक्षकाची जबाबदारी आहे, अशा मताचा मी आहे. त्यामुळे माझा फोकस या सीझनला या गोष्टीवरसुद्धा असेल की सोशल मीडिया ला किंवा इतर नवीन माध्यमांना स्पर्धकांनी त्यांचं संगीत कशा प्रकारे मांडायला हवं. त्यासाठी काही मार्गदर्शन करण्याचा आम्ही परीक्षक म्हणून जरूर प्रयत्न करू.

मी सगळ्या स्पर्धकांना त्यांच्या पुढील करिअरसाठी शुभेच्छा देईन, भरभरून आशीर्वाद देईन. सगळ्यांनी आपल्या करिअरमध्ये अतिउच्च शिखर सर करावं. पण सल्ला देण्याबद्दल जर सांगायचं झालं तर एवढंच सांगेन... “वक्त से पहले और नसीब से ज्यादा किसी को नहीं मिलता,” ही म्हण कायम लक्षात ठेवावी. मला मोठा गायक व्हायचंय, मला खूप उंची सर करायचीये, मला खूप पैसे कमवायचेत, मला खूप नाव कमवायचं, असं ठरवून कधीच चालू नये. आपण कायम जे आहोत, त्याच्यापेक्षा एक पाऊल दरवेळेस पुढे जातोय की नाही, एवढाच विचार करावा आणि जे काही मिळेल त्याबद्दल देवाचे आभार मानावेत, संगीताची आवड असलेल्या तरुणांनी प्रेरणा ही घ्यावी की आपण जर रियाज केला, गाणं शिकलो, गाण्यावर काम केलं, तर आपणही या स्पर्धकांसारखे एक दिवस मोठ्या मंचावरती गायक म्हणून जाऊ शकतो आणि आपलंही करिअर घडू शकतं. त्यांच्यासाठी हा एक चांगला राजमार्ग उपलब्ध आहे, याचा त्यांनी जरूर विचार करावा.यासोबतच मराठी भाषा पुढे जातेय, ही प्रेरणा घेऊन सर्वांनीच आपापलं कार्य चालू ठेवावं.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande