अभिनेत्री तेजस्विनी आणि समाधान सरवणकर यांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचं आगमन
मुंबई, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वातून एक गोड आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम तेजस्विनी लोणारी नुकतीच आई झाली आहे. तेजस्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला असून, तिचे पती आणि शिंदे गटाच्या शिवसे
तेजस्विनी लोणारी झाली आई; समाधान सरवणकरांच्या घरी चिमुकल्या राजकुमाराचं आगमन!


मुंबई, 22 ऑगस्ट, (हिं.स.)। मराठी मनोरंजनविश्वातून एक गोड आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. लोकप्रिय मराठी अभिनेत्री आणि ‘बिग बॉस मराठी’ फेम तेजस्विनी लोणारी नुकतीच आई झाली आहे. तेजस्विनीने गोंडस मुलाला जन्म दिला असून, तिचे पती आणि शिंदे गटाच्या शिवसेनेचे युवा नेते समाधान सरवणकर यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

समाधान सरवणकरांच्या घरी आता चिमुकल्या राजकुमाराचं आगमन झालं आहे. मुलाच्या जन्माने तेजस्विनी आणि समाधान यांच्या आयुष्यात आनंदाचं नवं पर्व सुरू झालं असून, संपूर्ण कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. या गोड बातमीची माहिती समोर येताच चाहत्यांसह मित्रपरिवार, कलाकार मंडळी आणि राजकीय वर्तुळातून तेजस्विनी-समाधान यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

समाधान सरवणकरांनी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. “आमचा छोटा राजकुमार आला आहे,” असं म्हणत त्यांनी आपल्या चिमुकल्या बाळाचं जगात स्वागत केलं. हातात घेण्यासाठी एक छोटासा हात, प्रेम करण्यासाठी एक छोटेसे हृदय आणि आयुष्यभर जपण्यासाठी सुंदर आठवणी… अशा भावनिक शब्दांत त्यांनी या नव्या प्रवासाचा आनंद व्यक्त केला आहे. त्यांच्या या पोस्टमधून मुलाच्या आगमनाचा आनंद आणि पालकत्वाची उत्सुकता स्पष्टपणे जाणवते.

तेजस्विनी लोणारी आणि समाधान सरवणकर यांनी ४ डिसेंबर २०२५ रोजी लग्नगाठ बांधली होती. त्यांच्या लग्नसोहळ्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली होती. लग्नातील पारंपरिक लूक, विधी, फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांच्या विशेष पसंतीस उतरले होते. लग्नानंतर आता काही महिन्यांतच त्यांच्या आयुष्यात चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झाल्याने त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला आहे.

अभिनयाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या तेजस्विनीच्या आयुष्यात आता आईपणाची नवी आणि सुंदर भूमिका आली आहे. तिच्यासाठी हा क्षण आयुष्यातील सर्वात खास आणि अविस्मरणीय क्षणांपैकी एक नक्कीच आहे. तर समाधान यांच्यासाठीही बाबा होण्याचा आनंद शब्दांत व्यक्त करणं कठीणच आहे. चिमुकल्या राजकुमाराच्या आगमनाने त्यांच्या घरात आनंद, प्रेम आणि उत्साहाचं वातावरण निर्माण झालं आहे. तेजस्विनी आणि समाधान यांच्या या नव्या प्रवासासाठी चाहतेही तितकेच उत्सुक असून, छोट्या राजकुमाराची एक झलक पाहण्यासाठी अनेकजण आतुर झाले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande