
सोलापूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : गेल्या ३४ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मोची समाजाच्या शैक्षणिक उपक्रमासाठी भूखंड मिळण्याच्या मागणीला अखेर यश आले आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शासन दरबारी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला शाळेसाठी जागा देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय मंजूर करण्यात आला. लष्कर आणि परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास असलेल्या मोची समाजातील गोरगरीब कामगारांच्या मुलांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी श्री जांबमुनी मोची समाजसेवा मंडळाला शाळेसाठी जागा देण्याची मागणी समाजाच्या वतीने आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे करण्यात आली होती.
या मागणीची दखल घेत आमदार देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना सकारात्मक प्रतिसाद देत शासनाने मंडळाला शाळेसाठी भूखंड देण्याचा निर्णय घेतला.
भूखंड मिळविण्यासाठी मोची समाजातील अनेक पदाधिकारी व नागरिकांनी यापूर्वी तत्कालीन आमदार, खासदार तसेच मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने मागणी केली होती. मात्र, गेल्या अनेक वर्षांपासून हा प्रश्न प्रलंबित होता. आमदार देवेंद्र कोठे यांनी हा विषय शासनाच्या पातळीवर प्रभावीपणे मांडल्यानंतर या प्रकरणाला गती मिळाली.
या निर्णयामुळे मोची समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, समाजाच्या ३४ वर्षांच्या मागणीला अखेर मूर्त स्वरूप मिळाले आहे.
---------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड