शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी माती-मुरुमावर आता रॉयल्टी नाही
- ट्रॅक्टरही कारवाईतून मुक्त - ‘भूतकाळाच्या गप्पांपेक्षा वर्तमान आणि भविष्याची चिंता करा’ - महसूलमंत्री बावनकुळे नागपूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : शेतजमिनीचे सपाटीकरण, शेतरस्ते व वहिवाटीचे रस्ते तयार करणे, तसेच शेतीच्या उपयोगासाठी जमीन तयार करण्यासाठी
बावनकुळे


- ट्रॅक्टरही कारवाईतून मुक्त

- ‘भूतकाळाच्या गप्पांपेक्षा वर्तमान आणि भविष्याची चिंता करा’ - महसूलमंत्री बावनकुळे

नागपूर, २१ ऑगस्ट (हिं.स.) : शेतजमिनीचे सपाटीकरण, शेतरस्ते व वहिवाटीचे रस्ते तयार करणे, तसेच शेतीच्या उपयोगासाठी जमीन तयार करण्यासाठी लागणारी माती आणि मुरूम यावर आता शेतकऱ्यांना कोणतीही रॉयल्टी भरावी लागणार नाही. या कामासाठी शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर तलाठी, तहसीलदार किंवा पोलिसांकडून कारवाई केली जाणार नाही, असे महसूलमंत्री तथा नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.

नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बावनकुळे यांनी राज्याच्या वाळू धोरणासंदर्भात ही माहिती दिली. यापूर्वी माती किंवा मुरूम वाहतूक करताना शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड आकारला जात असल्याच्या तक्रारी होत्या. आता शासनाने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक गरजा लक्षात घेऊन हा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. शेतात सपाटीकरण करणे, शेतरस्ता किंवा वहिवाटीचा रस्ता तयार करणे, शेतात घर बांधणे अथवा शेतीयोग्य जमीन तयार करणे यासाठी लागणाऱ्या गौण खनिजावर रॉयल्टी आकारली जाणार नाही. अशा कामासाठी माती कुठून आणली याबाबत स्वतंत्र मंजुरीची आवश्यकता राहणार नाही, असेही बावनकुळे म्हणाले.

मात्र, महसुली नाल्यातून माती काढायची असल्यास तलाठ्याची परवानगी घेणे आवश्यक राहील. शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी वापरल्या जाणाऱ्या माती-मुरुमावर मात्र रॉयल्टी आकारली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

‘भूतकाळाच्या गप्पांपेक्षा वर्तमान आणि भविष्याची चिंता करा’

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी २०१४ मध्ये भाजपकडून सरकार स्थापनेची ऑफर मिळाल्याच्या केलेल्या दाव्यावर बावनकुळे यांनी टीका केली. “मग त्यावेळी का नाही सरकार बनवले? कोणी मनाई केली होती? शिळ्या भाकरी का खाता? आता वर्तमानाबद्दल बोला. भविष्यात कोणी काय केले याची आत्मकथा लिहावी, मात्र माध्यमांमध्ये अशा पुड्या सोडणे योग्य नाही, असे ते म्हणाले. भूतकाळावर कोणी विश्वास ठेवत नाही. वर्तमान आणि भविष्याची काळजी घेण्याची गरज आहे, असा टोला त्यांनी चव्हाणांना लगावला.

‘राहुल गांधींचा बेस ढासळला’

राहुल गांधी यांच्या आंदोलनावरही बावनकुळे यांनी टीका केली. राहुल गांधींचा बेस ढासळला आहे. गर्दी जमा होत नाही, मान्यता मिळत नाही. त्यामुळे एखादा मुद्दा हातात घेऊन काहीतरी होईल, या अपेक्षेने त्यांचे राजकारण सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.

‘वंदे मातरम संपूर्ण गायले पाहिजे’

वंदे मातरमच्या मुद्द्यावर बोलताना बावनकुळे म्हणाले की, एखादी तांत्रिक चूक झाली असेल तर ती दुरुस्त केली पाहिजे. मात्र, भाजपच्या सभा, विधिमंडळ तसेच राज्य सरकारच्या कार्यक्रमांमध्ये पूर्णपणे वंदे मातरम गायले जात आहे. देशाच्या सरकारने केलेल्या नियमांचे पालन झाले पाहिजे आणि वंदे मातरम पूर्ण गायले गेले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.

वंदे मातरम हे देशाच्या संस्कार, संस्कृती आणि परंपरेचे प्रतीक असून, भारतमातेला सर्वोच्च स्थान आणि तिरंग्याला सर्वोच्च मान देण्याची भावना पुढच्या पिढीपर्यंत पोहोचली पाहिजे, असेही ते म्हणाले.

‘नेत्याला पद मिळाल्याने कार्यकर्त्यांचा आनंद स्वाभाविक’

नाशिकच्या पालकमंत्रिपदाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि पक्षातील पदांबाबत सुरू असलेल्या चर्चेवर बावनकुळे म्हणाले की, एखाद्या नेत्याला पद मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि आनंद असतो. आपला नेता मोठा झाला किंवा त्याला पद मिळाले याचा कार्यकर्त्यांना आनंद होतो. त्यातून विरोधकांनी एवढी धास्ती घेण्याची गरज नाही, असे त्यांनी सांगितले.

‘शाळेत तपासणी करताना संबंधित यंत्रणेला विश्वासात घ्या’

शाळांमध्ये तपासणी करण्याच्या मुद्द्यावर अभिजित दिपके यांना आवाहन करताना बावनकुळे म्हणाले की, शासकीय व्यवस्थेमध्ये शाळा तपासणी करताना काही त्रुटी आढळल्यास त्या दुरुस्त केल्या पाहिजेत. मात्र, संपूर्ण शाळा व्यवस्था खराब आहे, असा निष्कर्ष काढणे योग्य नाही.

शाळेत जाताना पोलिस प्रशासन, शिक्षण विभाग आणि शाळा व्यवस्थापनाला विश्वासात घेणे आवश्यक आहे. सरकारी धाड टाकल्यासारखी तपासणी करणे योग्य नाही. त्यामुळे संबंधित यंत्रणेला आधी माहिती देऊनच पुढील कार्यवाही करावी, अशी विनंती त्यांनी केली.

अंगणवाडी सेविकेवरील कारवाईची माहिती घेणार

अंगणवाडी सेविकेच्या निलंबनाबाबत बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुलांच्या आरोग्याच्या दृष्टीने तिने योग्य पद्धतीने सरकारसमोर विषय मांडला असेल तर तिच्यावर कारवाई करणे योग्य नाही. मात्र, नेमक्या कोणत्या कारणामुळे कारवाई झाली हे पाहावे लागेल. पुरवठ्यात काही गैरप्रकार किंवा इतर नियमभंग झाला असेल तर त्याची माहिती घेऊन आपणही लक्ष घालू, असे त्यांनी सांगितले.

साखरेच्या दरवाढीवर केंद्राशी चर्चा

साखरेच्या दरवाढीबाबत केंद्र आणि राज्य सरकारच्या पातळीवर चर्चा होईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या विषयाकडे लक्ष दिले आहे. साखरेचा साठा, पुरवठ्यातील तफावत किंवा इतर कारणांमुळे दरवाढ झाली असण्याची शक्यता आहे. केंद्राशी चर्चा करून यावर मार्ग काढला जाईल, असे बावनकुळे म्हणाले. साखरेऐवजी थेट इथेनॉल निर्मितीकडे काही कारखाने वळत असल्याने साखरेचे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बाबीकडेही लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande