नोबेल हायजीनचा 150 कोटींच्या नव्या इश्यूचा मार्ग मोकळा; सेबीकडे डीआरएचपी दाखल
मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.) : भारतातील ऍब्झॉर्बन्ट हायजीन उत्पादन क्षेत्रातील प्रमुख स्वदेशी कंपनी नोबेल हायजीन लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया
प्रतिकात्मक लोको


मुंबई, 21 ऑगस्ट (हिं.स.) : भारतातील ऍब्झॉर्बन्ट हायजीन उत्पादन क्षेत्रातील प्रमुख स्वदेशी कंपनी नोबेल हायजीन लिमिटेडने भांडवली बाजारात प्रवेश करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. कंपनीने बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडियाकडे (सेबी) ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस (डीआरएचपी) दाखल केला आहे. प्रस्तावित सार्वजनिक इश्यूमध्ये 150 कोटीं रूपयांपर्यंतचा नवीन इश्यू आणि विद्यमान भागधारकांकडून 1,55,11,082 पर्यंत इक्विटी शेअर्सच्या ऑफर फॉर सेलचा (ओएफएश) समावेश आहे.

नोबेल हायजीन दोन दशकांहून अधिक काळापासून प्रौढ, बाळ आणि महिलांसाठी ऍब्झॉर्बन्ट हायजीन उत्पादने तयार करत आहे. फ्रेंड्स, बी-फिट, टेडी, स्नगी आणि रिओ या ब्रँड्सच्या माध्यमातून कंपनीने विविध किंमत श्रेणी आणि ग्राहकांच्या गरजांनुसार उत्पादन पोर्टफोलिओ विकसित केला आहे. 31 मार्च 2026 पर्यंत कंपनीकडे 1,158 पेक्षा अधिक SKUs होते. नवीन इश्यूमधून मिळणाऱ्या निधीचा वापर काही कर्जांची परतफेड, उपकंपनी नोबेल हायजीन बडोदा प्रायव्हेट लिमिटेडमध्ये गुंतवणूक, तसेच हलोल येथे उत्पादन-सह-गोदाम सुविधा उभारण्यासाठी आणि प्रौढ डायपर उत्पादनासाठी नवीन मशीनरी खरेदी व स्थापित करण्यासाठी केला जाणार आहे. उर्वरित निधी सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरण्याचा प्रस्ताव आहे.

आर्थिक कामगिरीतही कंपनीने सुधारणा नोंदवली आहे. आर्थिक वर्ष 2025 मधील ₹739.14 कोटींच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2026 मध्ये कामकाजातून मिळणारा महसूल 14.56 टक्के वाढून ₹846.75 कोटी झाला. EBITDA ₹65.57 कोटींवरून ₹84.76 कोटींवर पोहोचला, तर EBITDA मार्जिन 8.87 टक्क्यांवरून 10.01 टक्के झाले. पुनर्रचित नफा ₹2.28 कोटींवरून ₹18.91 कोटींवर वाढला.कंपनी नाशिक आणि हलोल येथील प्रकल्पांमध्ये सुमारे 19 एकर क्षेत्रावर 14 उत्पादन लाइन्स चालवते. प्रौढ डायपर, बेबी डायपर आणि अंडरपॅड्सची एकूण वार्षिक स्थापित क्षमता 1,890.57 दशलक्ष युनिट्स आहे. देशभरातील 31 राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये 2.7 लाखांहून अधिक किरकोळ विक्री केंद्रांचे नेटवर्क असून, 19 देशांमध्ये निर्यात केली जाते.

दरम्यान, भारतातील प्रौढ ऍब्झॉर्बन्ट हायजीन बाजारपेठ 2031 पर्यंत ₹54-61 अब्जांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज DRHPमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. वाढती जागरूकता, उत्पादनांचा वाढता स्वीकार आणि सामाजिक संकोच कमी होणे यामुळे या बाजारपेठेला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. कंपनी डिस्पोजेबल पीरियड पँटीज बाजारात आणण्यासह उत्पादन क्षमता आणि बाजारपेठेतील उपस्थिती वाढवण्यावरही भर देणार आहे.या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून ICICI Securities, Motilal Oswal Investment Advisors आणि एसबीआय कॅपिटल मार्केटस कार्यरत आहेत.

-------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande