
नवी दिल्ली, 22 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळाचे (सेबी) अध्यक्ष तुहिन कांत पांडेय यांनी शनिवारी सांगितले की, भांडवली बाजार नियामक संस्था निर्गमाद्वारे उभारलेल्या निधीच्या वापरावर देखरेख ठेवणे आणि त्याबाबत माहिती देण्याशी संबंधित नियमांचा आढावा घेत आहे.
येथे इन्स्टिट्यूट ऑफ डायरेक्टर्सच्या वार्षिक संचालक परिषदेला संबोधित करताना पांडेय यांनी ही माहिती दिली. ते म्हणाले की, यामागील उद्देश वेळेवर माहिती उपलब्ध करून देणे आणि अनुपालनाची प्रक्रिया अधिक सुलभ करणे हा आहे. परिषदेला संबोधित करताना तुहिन कांत पांडेय म्हणाले की, पारदर्शकतेचा अर्थ केवळ एखाद्या कंपनीने किती माहिती दिली यापुरता मर्यादित नाही. ती माहिती गुंतवणूकदारांना आवश्यक बाबी समजून घेण्यास किती मदत करते, हे देखील महत्त्वाचे आहे.
ते म्हणाले की, सेबीने महत्त्वाच्या घटना आणि माहितीच्या प्रकटीकरणाशी संबंधित नियम सातत्याने अधिक मजबूत केले आहेत. संबंधित पक्षांमधील व्यवहारांशी संबंधित नियम अधिक स्पष्ट करण्याचाही सेबीने प्रस्ताव ठेवला आहे. यामुळे कंपन्यांसाठी नियम अधिक स्पष्ट आणि व्यावहारिक होतील, तसेच गुंतवणूकदारांसाठी आवश्यक संरक्षणात्मक उपायही कायम राहतील.
पांडेय यांनी सांगितले की, एखाद्या प्रकरणात एकापेक्षा अधिक स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध असलेल्या कंपन्यांवर अनेक स्टॉक एक्स्चेंजकडून दंडात्मक कारवाई होऊन दुहेरी शिक्षा होऊ नये, यासाठी सेबी एक नवीन आराखडा आणण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. सेबी प्रमुख म्हणाले, “नियमन अधिक प्रभावी करणे, तसेच त्याचा मूलभूत उद्देश कायम ठेवणे, हा यामागील हेतू आहे.” नियामकीय अनुपालनाबाबत ते म्हणाले की, सुशासनासाठी नियम प्रमाणबद्ध असणे आणि अनावश्यक पुनरावृत्ती टाळणे देखील आवश्यक आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule