दहावी बोर्ड परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू
फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इय
दहावी बोर्ड परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू


फेब्रुवारी-मार्च २०२७ परीक्षेसाठी ३१ ऑक्टोबरपर्यंत नियमित शुल्कासह अर्ज करता येणार

नांदेड, 21 ऑगस्ट (हिं.स.)। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२७ मध्ये घेण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खासगी विद्यार्थी, श्रेणीसुधार योजनेअंतर्गत तसेच आयटीआयच्या ‘ट्रान्सफर ऑफ क्रेडिट’ योजनेतील विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळा प्रमुखांमार्फत अर्ज सादर करावेत, असे आवाहन शिक्षण मंडळाने केले आहे.

मंडळाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑक्टोबर २०२६ आहे. त्यानंतर विलंब शुल्कासह १ नोव्हेंबर ते १५ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत अर्ज स्वीकारले जातील. अतिविलंब शुल्कासह १६ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत अर्ज करता येणार आहेत.

शाळांकडून परीक्षा शुल्क जमा

माध्यमिक शाळांनी विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क संकलित करून ते निर्धारित पद्धतीने संबंधित विभागीय मंडळाकडे जमा करावे. परीक्षा शुल्काच्या पावत्या तसेच विद्यार्थ्यांची यादी ७ डिसेंबर २०२६ पर्यंत विभागीय मंडळांकडे सादर करणे आवश्यक आहे.

अर्जातील तपशील तपासण्याच्या सूचना

ऑनलाइन अर्ज भरताना विद्यार्थ्याचे नाव, जन्मतारीख आणि इतर आवश्यक तपशील काळजीपूर्वक तपासण्याच्या सूचना मंडळाने दिल्या आहेत. अर्जाची पडताळणी केल्यानंतर विद्यार्थी आणि पालकांच्या स्वाक्षऱ्या घेणे आवश्यक आहे. तसेच अर्जासोबत छायाचित्र अपलोड करताना मंडळाने निर्धारित केलेल्या निकषांचे पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नसल्याने सर्व संबंधित शाळा, विद्यार्थी आणि पालकांनी निर्धारित वेळेत अर्ज प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने केले आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande