
परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त तसेच जलसंधारण दिनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये जलसंधारणाबाबत जनजागृती करण्यासाठी परभणीत ‘महा-वॉकेथॉन – वॉक फॉर वॉटर’चे आयोजन करण्यात आले. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा, जलयुक्त महाराष्ट्र घडवा’ हा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला परभणीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून कृषी विद्यापीठ क्रीडा संकुलापर्यंत या महा-वॉकेथॉनचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद अध्यक्षा लता वाकळे यांच्या हस्ते वॉकेथॉनचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापौर सय्यद इकबाल, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर, मनपा आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संजय घोन्सीकर, जिल्हा जलसंधारण अधिकारी कविराज कुचे आणि तहसीलदार डॉ. संदीप राजापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
वॉकेथॉनदरम्यान ‘पाणी वाचवा, पाणी अडवा, पाणी जिरवा’, ‘माती वाचवा, पाणी वाचवा’, ‘पाण्याचा प्रत्येक थेंब अनमोल, जपुया त्याचे मोल’, ‘पावसाचा प्रत्येक थेंब अडवूया, हिरवागार महाराष्ट्र घडवूया’, ‘थेंब थेंब पाणी साठवूया, भविष्यातील दुष्काळ टाळूया’, ‘पाणी नाही तर विकास नाही’, ‘जलसंधारणाशिवाय पर्याय नाही’ आणि ‘जल है तो कल है’ अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
यावेळी चित्ररथाच्या माध्यमातूनही जलसंधारणाचे महत्त्व नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आले. जलसंधारण विभागाच्या वतीने ‘रील्स बनवा, बक्षीस मिळवा’ या उपक्रमाची माहिती देण्यात आली. सोशल मीडियाच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवावा, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागाकडून करण्यात आले.
जलसंधारण ही केवळ शासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचा सहभाग आवश्यक आहे, हा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. पाण्याचे संवर्धन आणि भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी जलसंधारणाच्या उपाययोजनांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, यावरही यावेळी भर देण्यात आला.
----------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis