
परभणी, २१ ऑगस्ट (हिं.स.)। पाथरी शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ लगत करण्यात आलेल्या अतिक्रमणांविरोधात अखेर प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने बजावलेल्या नोटिसांनंतर अनेक दुकानदारांनी स्वयंस्फूर्तीने अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात केली असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या पाथरीकरांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या माजलगाव उपविभागाकडून यापूर्वी शेकडो अतिक्रमणधारकांना नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. सोनपेठ टी-पॉईंटपासून पोहेटाकळी शिवारातील पोखर्णी टी-पॉईंटपर्यंत महामार्गाच्या दोन्ही बाजूंना मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. महामार्गालगतच्या नाल्यांवरच बांधकामे उभारण्यात आल्याने वाहतुकीसोबतच पावसाच्या पाण्याच्या निचऱ्याची समस्याही निर्माण झाली होती.
सेंट्रल नाका, बसस्थानक परिसर तसेच छत्रपती शिवाजी महाराज चौकात अतिक्रमणांमुळे वारंवार वाहतूक कोंडी होत होती. पावसाळ्यात नाल्यांची स्वच्छता आणि पाण्याचा प्रवाह अडल्याने नवा मोंढा परिसरातील नाल्यांचे पाणी थेट महामार्गावर येण्याच्या घटनाही घडत होत्या.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याच्या मध्यापासून दोन्ही बाजूंना १५ मीटरपर्यंतची अतिक्रमणे हटविण्याचे निर्देश दिल्यानंतर अनेक व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे. काही ठिकाणी पत्र्यांचे शेड, पायऱ्या, फलक तसेच इतर तात्पुरती बांधकामे हटविण्यात येत आहेत.
दरम्यान, पंचायत समिती परिसरातही अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईचे पडसाद उमटले आहेत. महामार्गालगत अतिक्रमण करणाऱ्या काही टपरीधारकांनी आपल्या टपऱ्या पंचायत समिती शॉपिंग कॉम्प्लेक्ससमोर मागे घेतल्या. त्यामुळे तेथील मूळ दुकानदारांच्या व्यवसायावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती.
यानंतर शॉपिंग कॉम्प्लेक्समधील दुकानदारांनी एकत्र येत नव्याने करण्यात आलेले अतिक्रमण हटविले. महामार्गालगतची अतिक्रमणे पूर्णपणे हटविल्यानंतर वाहतूक सुरळीत होण्याबरोबरच नाल्यांचा पाण्याचा प्रवाहही मोकळा होण्यास मदत होणार आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या पुढील कारवाईकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. अतिक्रमणमुक्त झाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी कितपत कमी होते आणि पाणी निचऱ्याची समस्या कितपत सुटते, हे आगामी काळात स्पष्ट होणार आहे.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis